गुंतवणुकीसह पार्टनरशीपची ऑफर देऊन अठरा कोटीची फसवणुक
दोन बिल्डरसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – बांधकाम व्यवसायातील ग्रुपमध्ये गुंतवणूकीच्या बदल्यात चांगला परतावा आणि भागीदारी देण्याचे आमीष दाखवुन दादरमधील व्यवसायिकाची करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार सामोर आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक कश्यप मेहता, अतुल भाराणी आणि पंकज भुटा यांच्या विरोधात गुम्हा दाखल करून माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिवाजी पार्क परिसरात रहात असलेल्या फिर्यादी प्रतीक वीरा (४०) यांचा बांधकाम आणि फायनांन्सचा व्यवसाय आहे. प्रतीक यांचे वडील फायनान्स ब्रोकरेजचा व्यवसाय करत असताना २००४-०५ मध्ये बांधकाम व्यावसायिक कश्यप मेहता आणि अतुल भाराणी यांनी त्यांची भेट घेतली. दोघांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायातील सनशाईन ग्रुपबाबत माहिती देत गुंतवणूकीच्या बदल्यात चांगला परतावा आणि भागीदारी देण्याचे आमीष दाखविले.
प्रतीक आणि त्यांच्या वडिलांनी २००६ पासून सनशाईन ग्रुपमध्ये स्वतः गुंतवणूक सुरू केली. तसेच, त्या कंपनीला अन्य गुंतवणुकदार मिळवून दिले. अशा प्रकारे सुमारे १५० कोटी रूपयांची गुंतणूक वीरा पिता-पुत्राच्या माध्यमातून कंपनीत केली गेली. मेहता आणि भाराणी यांनी प्रतीक यांना ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपनीत सुमारे २० टक्केपर्यंत शेअर्स आणि सुमारे २६ कंपन्यांमध्ये भागिदार/शेअरहोल्डर/डायरेक्टर म्हणून नेमणूक केली.
शेअर्स आणि पदे दिलेली असली तरी प्रतीक यांना पैशांचे व्यवहार आणि मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. दरम्यान सनशाईन हाउसिंग प्रा. लि. भांडुपच्या समृध्दी गार्डन प्रकल्प आणि मयुरपंख प्रॉपर्टीज प्रा. लि. अंधेरीचे जुहू एकता प्रकल्पासाठी एकूण सुमारे ८० कोटी रुपये कर्ज घेण्याचे मार्च २०१५ मध्ये ठरले. दरम्यान, सनशाईन ग्रुपचे प्रमुख एका कामासाठी कर्ज किंवा गुंतवणूक किंवा फ्लॅट विक्रीचे पैसे घेतात. ते अन्य ठिकाणी वापरत असल्याचे प्रतीक यांना समजले.
प्रतीक यांनी या गैरकारभाराला विरोध केला. त्यामुळे प्रतीक यांना कंपनीच्या कामकाजापासून दूर करण्यात आले. आपल्या संम्मतीशिवाय यातील आरोपींनी सुमारे २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे प्रतीक यांना समजले. त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी करत न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, भांडुप येथील समृध्दी गार्डन कंन्स्ट्रक्शन साईटच्या डेव्हलेपमेंटसाठी एलआयसी हाऊसिंग फायनांन्स लि.कडून एकूण ९० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. यातील ६२ कोटी रूपयांच्या कर्ज वितरणातील ४३ कोटी रूपये सरळ कायदेशीर कामासाठी कंपनीने वापरले. तर, १८ कोटी २२ लाख ५५ हजार रुपये रक्कम अटींच्या विरूध्द नियमबाह्यरितीने गैरव्यवस्थपन करुन या निधीचा अपहार केल्याने प्रतीक यांनी कुर्ला न्यायालयात केस दाखल केली.
अखेर, न्यायालयाच्या आदेशाने माटुंगा पोलिसांनी प्रतीक यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गैरकारभारामुळे दोन्ही फेज/प्रकल्प बंद पडले आणि कंपनी दिवाळखोरीत गेल्याचा आरोप प्रतीक यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. तसेच, त्यांनी त्यांचे ३४ कोटी ४५ लाखांचे नुकसान झाले एकूण ३८ कोटी ३५ लाखांची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. हा वाद उच्च न्यायलयात प्रलंबित असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.