मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालकाने घटनास्थळाहून पलायन केले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात शुक्रवारी २७ सप्टेंबरला मध्यरात्री तीन वाजता माटुंगा येथील रफि अहमद किडवाई मार्ग, हाजान हालिया मदरसासमोरील उत्तर वाहिनीवर झाला. नरेंद्र संतोष वाघ हे कल्याण येथे राहत असून माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री त्यांची नाईट शिफ्ट होती. रात्री उशिरा ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री तीन वाजता त्यांना एका तरुणाने हाजान हालिया मदरशासमोर अपघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे पोलिसांना एक महिला गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तिला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या महिलेची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
प्राथमिक तपासात एका भरवेगात जाणार्या वाहनाने तिला धडक दिली होती. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर आरोपी चालक तिला कुठलीही वैद्यकीय मदत अथवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे नरेंद्र वाघ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचार्याच्या महिलेस धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे मृत महिलेची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केल्याचे सांगण्यात आले.