आठशे कोटीच्या प्रॉपटीच्या अपहारप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा
ट्रस्टच्या नावाने विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – सुमारे आठशे कोटीच्या प्रॉपटीचा परस्पर अपहार करुन एका वयोवृद्धाची त्याच्याच नातेवाईकांनी फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांसह आठजणांविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद खिमजी शहा, गिरीश खिमजी शहा, फोरम गिरीश शहा, निकिता विनोद शहा, कल्पना खिमजी शहा, फईम रईस, असिम रईस आणि राजेश धनजी गाला अशी या आठजणांची नावे आहेत. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार असून सर्व आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ट्रस्टच्या नावाने विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्यानंतर या नातेवाईकांनी काही प्रॉपटी परस्पर विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चापशी पोपटलाल शहा हे ७५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे गुजरातच्या भूजचे रहिवाशी असून सध्या दादर परिसरात राहतात. ते कापड व्यापारी असून त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना पाच मुली असून त्या सर्वांचा विवाह झाला आहे. १९६५ साली त्यांनी त्यांचे दोन बंधू खिमजी आणि कानजी यांच्यासोबत दादर येथे कपड्याचा व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायातून झालेल्या नफ्यातून त्यांनी व्यवसाय वाढीसह एकत्र कुटुंबासाठी अनेक छोट्या मोठ्या प्रकारच्या स्थावर मालमत्ता घेतले होते. खिमजी हा मोठा भाऊ असल्याने ही प्रॉपटी त्याच्या नावाने घेण्यात आले होते. दादर, विरार,, पालघर, बोंळीजसह इतर ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांची कोट्यवधी रुपयांची प्रॉपटी आहे. काही वर्षांनंतर त्यांचा भाऊ खिमजी आणि त्यांची पत्नी दिवालीबेन खिमजी शहा यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर आतापर्यंत कुटुंबात कधीही प्रॉपटीचे विभाजन झाले नव्हते.
खिमजीचे दोन्ही मुले विनोद आणि गिरीश हे त्यांच्या मुलांसारखे असल्याने त्यांच्यावर त्यांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास होता. त्याचाच या दोघांनी गैरफायदा घेतला होता. वडिल खिमजी शहा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची खाजगी ट्रस्ट बनवत आहोत असे सांगून त्यांनी त्यांच्या विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली होती. दादर परिसरातच त्यांच्या कुटुंबियांची तीनशे कोटीची प्रॉपटी होती. या प्रॉपटीच्या कागदपत्रांवरही त्यांनी ट्रस्टच्या नावाने त्यांची स्वाक्षरी घेतली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी विनोद आणि गिरीश यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण प्रॉपटीची माहिती मागितली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना ती माहिती दिली नाही.
ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन कार्यालयात एक अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना त्यांच्या प्रॉपटीचा तपशील देण्यात आला होता. या कागदपत्रांची पाहणी करताना त्यांना त्यांचे पुतणे विनोद, गिरीश, त्यांची पत्नी फोरम, निकिता, पुतणी यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विश्वासासह प्रेमाचा गैरफायदा घेऊन शहा कुटुंबियांची एकत्रित स्थावर प्रॉपटीची खाजगी ट्रस्ट न बनविता मानव वेल्फेअर ट्रस्ट या खाजगी ट्रस्टच्या नावाने बनविली होती. या ट्रस्टमध्ये नोंद केलेल्या सर्व प्रॉपटी त्यांच्यावर नावावर करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते.
त्यांच्या विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन त्यांच्याच नातेवाईकांनी इतर काही लोकांच्या मदतीने सुमारे ८०० कोटीच्या प्रॉपटीचा परस्पर अपहार करुन त्यांच्यासह त्यांच्या पत्नीची फसवणुक केली होती. त्यापैकी तीनशे कोटीच्या प्रॉपटीची परस्पर विक्री केली. या पैशांतून त्यांनी त्यांनी स्वतसह पुतणी कल्पनाच्या मदतीने मुंबईसह इतरत्र अन्य प्रॉपटी खरेदी केल्या होत्या. १९८० साली त्यांनी माटुंगा येथे १२ गुंटे जागा पाहिली होती. ही जागा असिस रईस आणि फईम रईस या दोन बंधूंच्या मालकीची होती. या जागेवर त्यांच्यासह खिमजी आणि रईस बंधूंनी व्हाईट हाऊस नावाची एक कंपनी स्थापन केली होती. ती जागा विकसित करण्यासाठी त्यांनी सुमारे दिड कोटी खर्च केले होते.
जागेवर रईस आणि शहा बंधू ५० टक्के पार्टनर होते. तिथेच सिटी पॉईट नावाच्या एका हॉटेलचे काम सुरु झाले होते. या प्रॉपटीवरुन त्यांचे नाव नंतर काढून टाकण्यात आले होते. आजच्या बाजारभावाप्रमाणे ही प्रॉपटी दिडशे कोटीची आहे. अशाच प्रकारे इतर काही प्रॉपटीवर त्यांच्या स्वाक्षर्या घेऊन त्यांचे नावे काढून टाकण्यात आले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच चापशी शहा यांनी कुर्ला येथील लोकल कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कोर्टाने संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश माटुंगा पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर त्यांच्या तक्रारीवरुन माटुंगा पोलिसांनी विनोद शहा, गिरीश शहा, फोरम शहा, निकिता शहा, कल्पना शहा, फईम रईस, असिम रईस आणि राजेश गाला या आठजणांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून आठशे कोटीच्या प्रॉपटीचा अपहरासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.