गुंगीचे औषध देऊन प्रवाशांचे मौल्यवान सामानाची चोरी

उत्तरप्रदेशातून आरोपीस अटक; अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – गुंगीचे औषध देऊन प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची चोरी करणार्‍या युनूस शफीकउद्दीन शेख नावाच्या एका ५२ वर्षांच्या आरोपीस माटुंगा पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. युनूस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह आंधप्रदेशात अशाच प्रकारच्या चार गुन्ह्यांची तर उत्तरप्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येसह हत्येचा प्रयत्न, दंगल घडविल्याचे इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्याच्या एका सहकार्‍याचा सहभाग उघडकीस आला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

शैलेंद्र कमलाकर साठे हे मूळचे पुण्याच्या बाणेर, योगी पार्कचे रहिवाशी आहेत. १४ जूनला ते पुण्यातील वाकड येथून शिवनेरी बसमधून मुंबईत येत होते. खालापूर फुड मॉलजवळ त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉफीतून गुंगीचे औषध दिले होते. कॉफी प्यायल्यानंतर ते बसमध्येच बेशुद्ध झाले होते. याच दरम्यान या व्यक्तीने त्यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल आणि वॉलेटमधील पैसे असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. माटुंगा येथे आल्यानंतर ते शुद्धीवर आले आणि त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यामुळे त्यांनी माटुंगा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ३२८, ३७९ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय जगतप, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळी, सहाय्यक फौजदार जयेंद्र सुर्वे, पोलीस शिपाई यशवंत घाडगे, किशोर देशमाने, देवेंद्र बहादुरे, हनुमान मेटकर, प्रविण तोंडासे, साळुंखे पोलीस हवालदार निकम यांनी खालापूर फुड मॉल ते दादर, मुंबई सेंट्रलसह इतर ठिकाणाचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन माटुंगा पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला गेली होती. या पथकाने मेरठ शहरातून युनूस शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच त्याच्या एका मित्राच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. युनूस हा मेरठच्या गुजरी बाजार, शाहनथन, मकान क्रमांक ५८ मध्ये राहत असून व्यवसायाने इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्याच्याकडून पोलिसांनी तीस ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येसह हत्येचा प्रयत्न, दंगल घडविणे तसेच आंधप्रदेशासह मुंबई शहरात गुंगीचे औषध देऊन प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहकारी पळून गेल्याने त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. कुठलाही पुरावा नसताना केवळ सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page