शेअर व्यावसायिकाच्या घरी मोलकरणीची हातसफाई

दहा लाखांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी मोलकरणीवर गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – दादर येथे राहणार्‍या एका 53 वर्षांच्या शेअर व्यावसायिकाच्या घरी त्यांच्या मोलकरणीने हातसफाई करुन सुमारे दहा लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगीता मंगेश कार्शिकर या आरोपी मोलकरणीविरुद्ध माटुंगा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. संगीता ही तिच्या रत्नागिरीच्या गावी पळून गेली असून गावाहून परत येताच तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

कुमार हरखचंद शहा हे दादर येथील हिंदु कॉलनीतील रहिवाशी असून त्यांचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे. चौदा वर्षांपूर्वी आईच्या निधन झाले होते, तेव्हापासून ते संबंधित ठिकाणी एकटे राहतात. त्यामुळे त्यांनी घरातील कामासाठी एका महिलेला ठेवले होते. गेल्या वर्षी जून महिन्यांपासून त्यांच्याकडे संगीता कार्शिकर ही घरकामासाठी येत होती. ती वसई येथे राहत असून काही महिन्यांनी तिने नोकरी सोडली होती. त्यानंतर ती जानेवारी 2025 पासून पुन्हा तिथे कामासाठी येत होती. 9 मेला तिच्या मुलाचे रत्नागिरीच्या राजापूर, उपळे गावी लग्न होते, त्यामुळे ती 20 एप्रिलपासून कामावर येणार नाही असे सांगितले होते. त्यासाठी 1 एप्रिलला तिने अन्य एका महिलेला कामावर आणले होते. याच दरम्यान तिने तिला संपूर्ण कामाची माहिती दिली होती.

8 एप्रिलला संगीता कामावर आली नाही. त्यामुळे त्यांनी तिला विचारले असता तिने ती लोकलमधून पडल्याचे सांगून कामावर आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. याच दरम्यान त्यांच्याकडे येणार्‍या दुसर्‍या महिलेने संगीता ही तिच्या गावी गेल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांनी कपाटातील काही कागदपत्रे काढले होते. यावेळी त्यांना त्यांच्या आईची दोन लाखांची हिरेजडीत नाकातील नथ आणि आठ लाखांची 22.700 ग्रॅम वजनाची सोन्यासचे काळ्या रंगाचे मंगळसूत्र असा दहा लाखांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी कपाटात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला,

मात्र त्यांना कुठेही दागिने सापडले नाही. ते दागिने संगीतानेच चोरी करुन कामावर येणे बंद करुन गावी पलायन केले असावे असा संशय व्यक्त करुन त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संगीता कार्शिकर हिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात संगीता ही तिच्या गावी गेल्याचे उघडकीस आले असून गावाहून परत येताच तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर या चोरीबाबत अधिक खुलासा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page