पाणी चोरीच्या तक्रारीवरुन एकाच कुटुंबातील चौघांवर हल्ला
हल्लेखोर आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – पाणी चोरीची महानगरपालिकेसह स्थानिक पोलिसांत तक्रार केल्याच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांवर घरात घुसून एका टोळीने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना माटुंगा परिसरात घडली. या हल्ल्यात अभिदिन नेवरेकर हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. इतर जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसाीं हल्लेखोर आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये दिलीप जगली, देवा जगली, फिलीप जगली, वसीमलाल, प्रसाद सपकाळ, राजू जगली, अॅन्थोनी जगली व इतरांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजता माटुंगा येथील भाऊ दाजी रोड, कमलानगरमध्ये घडली. या परिसरातील रुम क्रमांक चौदामध्ये सिमरन नदीम पागरकर ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोपींकडून चोरीच्या पाण्याचा वापर केला जात होती. पाणी चोरी करणार्या या आरोपीविरुद्ध पागरकर कुटुंबियांनी महानगरपालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीवरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. 23 मे 2025 रोजी पागरकर कुटुंबियासोबत आरोपीचे भांडण झाले होते.
त्याचा सूड घेण्यासाठी जगली कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत त्यांच्या घरात घुसून तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सिमरन पागरकर हिचा भाऊ अल्ताफ, काका अभिदिन नेवरेकर, आजी, आत्या सईदा नावरेकर हे चौघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे या सर्वांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अभिदिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले तर इतर तिघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सिमरन पागरकर हिच्या तक्रारीवरुन पोलिसाीं जगली कुटुंबियासह त्यांच्या सहकार्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत काही संशयितांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपींच्या चौकशीतून इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.