ऑनलाईन जुगारात पैसे हरले म्हणून सोनसाखळी चोरी

अडीच लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – ऑनलाईन जुगारात पैसे हरले म्हणून सोनसाखळी चोरी करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना माटुंगा पोलिसांनी अटक केली. मोहित अशोक संगिशेट्टी आणि रोहित ओमसिंग गौंड अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कुर्ला येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची सोनसाखळी आणि गुन्ह्यांतील बाईक असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

विजया हरिया ही 74 वर्षाची वयोवृद्ध महिला माटुंगा परिसरात राहते. शनिवार 19 जुलैला ती घरातून जवळच असलेल्या जैन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. रात्री पावणेनऊ वाजता दर्शन घेऊन घरी जात असताना बाईक्वरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त आर रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांनी माटुंगा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोडासे, बहादुरे, सोनवलकर यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहित संगिशेट्टी आणि रोहित गौड या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ते दोघेही कुर्ला येथील न्यू मिल रोड, संभाजी चौक, अंबुबाई चाळ व महानंद इमारतीमध्ये राहतात. या दोघांनाही ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद होता. त्यात त्यांना प्रचंड नुकसान झाले होते. जुगारात पैसे हरल्याने त्यांनी सोनसाखळी चोरीचा निर्णय घेतला होता. मात्र गुन्हा करुन पळून गेलेल्या या दोघांनाही दिवसांत चोरीच्या मुद्देमालासह अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page