पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक
लग्नाच्या आमिषाने लैगिंक अत्याचार करुन धमकी दिल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर ओळख झालेल्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षांच्या आरोपी प्रियकराला माटंगा पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आरोपीच्या आईसह बहिणीला सहआरोपी करण्यात आले असून या दोघींनी पिडीत मुलीला रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
पिडीत मुलगी पंधरा वर्षांची ती वडाळा परिसरात राहते. २२ वर्षांचा शाहिद हा तिच्या मामाचा मित्र असून त्यांची इंटाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ऑगस्ट महिन्यांत ते दोघेही माटुंगा येथील फाईव्ह गार्डन आणि काळाचौकीच्या कॉटनग्रीनमधील एका पडक्या घरात भेटले होते. तिथे त्याने तिच्याशी अनेकदा अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिने लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्याच्या आईसह बहिणीला हा प्रकार सांगितला होता. यावेळी या दोघांनी तिला शाहिदचा नाद सोड नाहीतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र शाहिदकडून झालेली फसवणुक आणि नंतर त्याने तिचा केलेला मानसिक व शारीरिक शोषण तसेच तिच्या आई-बहिणीकडून तिला जिवंत मारण्याची देण्यात आलेल्या धमकीनंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहिदसह त्याच्या आई आणि बहिणीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी शाहिदला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या आईसह बहिणीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या दोघींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. दरम्यान पिडीत मुलीची सायन हॉस्पिटलमध्ये मेडीकल करण्यात येणार असून नंतर आरोपीलाही मेडीकलसाठी पाठविले जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.