मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दादर परिसरात राहणार्या एका 81 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाच्या घरी त्यांच्याच नोकरांनी हातसफाई केली. कपाटातील दहा लाखांच्या कॅश चोरीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात नोकराविरुद्ध माटुंगा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांच्या घरातील दोन नोकरासह पूर्वी कामाला असलेल्या नोकरांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यापैकी एका नोकराने चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ही घटना 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळील आर ए रेसीडन्सी इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या बी विंग, फ्लॅट क्रमांक 3502 मध्ये विसनजी पाल मारु हे वयोवृद्ध त्यांची वयोवृद्ध पत्नी जयाबेन यांच्यासोबत राहतात. त्यांचे रिटेल दुकान असून गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. वयोवृद्ध असल्याने त्यांचा सर्व व्यवहार त्यांच्या राहत्या घरातून चालतो. त्यांच्याकडे घरकामासाठी दोन नोकर आहेत. त्यात छोटू मनिजन यादव हा झारखंडचा रहिवाशी असून सकाळी सात ते नऊ या दरम्यान तर दुसरा क्रिष्णा विद्येश्वर साहू हा वसई येथे राहत असून सकाळी दहा ते अकरा या दरम्यान काम करुन निघून जातो.
28 सप्टेंबरला त्यांनी कामाचे दहा लाखांची कॅश घरी आणली होती. ही कॅश त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवली होती. या दरम्यान त्यांना पैशांची गरज लागली नव्हती, त्यामुळे त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. 6 ऑक्टोंबरला पैशांची गरज असल्याने त्यांनी कपाटातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना कपाटात दहा लाखांची कॅश सापडली नाही. त्यांनी कपाटात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांना ती कॅश कुठेही सापडली नाही.
त्यांच्या घरी त्यांच्या नोकरावगळता कोणी येत नव्हते. त्यामुळे ही चोरी त्यांच्या घरी काम करणार्या आजी-माजी नोकरांनीच केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यांच्याकडे काम करणार्या दोन्ही नोकरासह पूर्वी काम करणार्या नोकरांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.