जुन्नर येथे साखरपुड्यासाठी गेल्यानंतर घरात हातसफाई
65 वर्षांच्या वयोवृद्ध मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – साखरपुड्यासाठी जुन्नर येथे गेल्यानंतर घरातील वयोवृद्ध मोलकरणीने कपाटातील सुमारे साडेसात लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याचा धक्कादायक प्रकार शिवडी परिसरात उघडकीस उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरीता नास्कर या 65 वर्षांच्या वयोवृद्ध मोलकरणीवर शिवडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
शिवानी राजेंद्र माझगावकर ही 25 वर्षांची तरुणी तिची बहिण रियासोबत माझगाव येथील डॉकयार्ड रोड, दुसरा कोळीवाडा, अमेय अपार्टमेंटमध्ये राहते. ती पूर्वी एका खाजगी कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होती. तिने नोकरी सोडली असून सध्या ती घरीच असते. तिची बहिण वांद्रे येथील बीकेसी परिसरात एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिचे पती राजेंद्र यांचे 2017 साली तर आई मिनाक्षी हिचे ऑगस्ट 2024 साली निधन झाले होते. त्यांच्याकडे सरीता ही वयोवृद्ध महिला घरकाम करते. तिची आई आजारी असल्याने त्यांनी सरीताला घरी कामावर ठेवले होते.
2 एप्रिलला तिचा जुन्नर येथे साखरपुडा झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात तिचे लग्न होणार आहे. साखरपुडा असल्याने ती तिच्या बहिणीसोबत जुन्नर येथे गेली होती. यावेळी तिने कपाटात तिचे सर्व दागिने सुरक्षित ठेवले होते. जुन्नरहून घरी आल्यानंतर तिने अलीकडेच कपाटातील दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला कपाटातून साडेसात लाखांचे विविध सोन्याचे दागिने दिसून आले नाही. याबाबत तिने तिच्या बहिणीकडे विचारणा केली होती, मात्र तिला दागिन्याविषयी काहीच माहिती नव्हती.
तिच्या घरी सरीता वगळता इतर कोणीही आले नव्हते. त्यामुळे 31 मार्च ते 29 एप्रिल 2025 या कालावधीत सरीताने घरकाम करताना कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याचा संशय व्यक्त करुन तिने तिच्याविरुद्ध शिवडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.