केईएम हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या ऍडमिशनच्या नावाने गंडा
अठरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – केईएम हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या ऍडमिशनच्या नावाने एका व्यक्तीची दोन ठगांनी सुमारे अठरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रविण टन्ना आणि विकास यादव या दोघांविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
सुरेशकुमार तुळशीराम नाई हे ठाण्यातील भिवंडी, काल्हेर परिसरात राहत असून त्यांचा ठाकूर हेअर शॉप नावाचे एक दुकान आहे. चेंबूरच्या सुमननगर येथे त्यांचा नकली केस बसविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त त्यांची अनेक ग्राहकांशी चांगली ओळख झाली होती. त्यात प्रविण टन्ना व त्याचा मुलगा सन्नी टन्ना यांचा समावेश होता. या ओळखीनंतर सन्नीने त्यांच्या मुलीबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांची मुलगी ज्योती ही दिल्लीतील ग्रॅट नोएडा येथे शिक्षण घेत असून ती एमबीबीएसची तयारी करत असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या मुलीला केईएम हॉस्पिटलमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे वडिल प्रविण टन्नाची चांगली ओळख असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याने प्रविणशी चर्चा केल्यानंतर त्याने त्याचा मित्र विकास यादव हा ऍडमिशन करुन देईल असे सांगून ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. प्रवेश होण्यापूर्वी वीस लाख रुपये आणि नंतर वीस लाख रुपये देण्याचे ठरले होते. प्रविण आणि विकासवर विश्वास ठेवून त्यांनी त्याला १६ जून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत १७ लाख ८० हजार रुपये दिले होते.
मात्र ही रक्कम देऊन त्यांनी त्यांच्या मुलीचे एमबीबीएससाठी ऍडमिशन करुन दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी ऍडमिशनसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रविण टन्ना आणि विकास यादव यांच्याविरुद्ध ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता कलमातर्ंगत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.