नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेशाची बतावणी करुन फसवणुक
शिक्षिकेला २२ लाखांना गंडा घालणार्या ठगाला कोलकाता येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो अशी बतावणी करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. याच टोळीशी संबंधित एका मुख्य आरोपीस कोलकाता येथून अटक केली. आनंदकुमार राम असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीच्या अटकेने अशा प्रकारच्या फसवणुकीचे अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
यातील तक्रारदार महिला शिक्षिका असून ती तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहते. तिच्या मुलीला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिला सोशल मिडीयावर एक जाहिरात दिसली होती. त्यात मेडीकल कॉलेजमध्ये हमखास प्रवेश मिळण्याची संधी असल्याचे नमूद करुन संबंधित व्यक्तीने ते मेडीकल सल्लागार म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिने दिलेल्या लिंकवर तिच्या मुलीसाठी अर्ज केला होता. यावेळी तिला चार ते पाच मेडीकल कॉलेजची माहिती देऊन त्यापैकी एका कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळेल असे सांगून अज्ञात व्यक्तीने तिचा विश्वास संपादन केला होता. याच दरम्यान तिची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीनंतर तिच्याकडून सीट बुकींगसह फी आणि इतर कामासाठी सुमारे २२ लाख रुपये घेण्यात आले होते. ही रक्कम तिने ऑनलाईन वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले होते. काही दिवसांनी तिला एका मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे ऑफर लेटर पाठविण्यात आले होते. या मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर तिला तिथे तिच्या मुलीला प्रवेश मिळाला नसल्याचे तसेच तिच्या नावाने फी जमा करण्यात आली नसल्याचे समजले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना यातील काही आरोपी कोलकाता येथे वास्तव्यास असल्याची माहिती सायबर सेल पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार सुहास नलावडे, किरण वसईकर, सुनिल नाडगौडा, सोनाली दळवी, प्राची मुडिक, हबीब सय्यद आदीचे एक पथक कोलकाता येथे पाठविण्यात आले होते.
या पथकाने मिळालेल्या माहितीवरुन कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या आनंदकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतच्या चौकशी आनंदकुमार हा मूळचा धनबादचा रहिवाशी असून तो उच्चशिक्षित आहे. कोरोना काळात त्याने क्रिस्टो करन्सीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. ते नुकसान भरुन काढण्यासाठी तो फसवणुक करणार्या या टोळीत सामिल झाला होता. या टोळीने एमबीबीए कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विविध बँक बोगस बँक, सोशल मिडीयावर बोगस लिंकसह जीमेल अकाऊंट तयार केले होते. ही लिंक व्हायरल केल्यानंतर अनेकांनी त्यांना संपर्क साधला होता. आपण वैद्यकीय सल्लागार म्हणून काम करत असून गरजू लोकांना देशभरातील काही नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचे ही टोळी सांगत होती. त्यानंतर त्यांच्याकडून सीट बुकींगसह फी आणि इतर कामासाठी आगाऊ पेमेंट घेत होती. या पैशांचा अपहार करुन ही टोळी फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आनंदकुमारच्या अटकेनंतर त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले.