एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने महिलेची साडेचौदा लाखांची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या दोघांना पुण्यासह उत्तरप्रदेशातून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑगस्ट 2025
मुंबई, – एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने एका महिलेची साडेचौदा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या तीनपैकी दोन भामट्यांना पकडण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले. कृष्णमोहन विष्णूदत्त शर्मा आणि एनुल झेनुल हसन अशी या दोघांची नावे असून यातील कृष्णमोहनला पुण्यातून तर एनुलला उत्तरप्रदेशातील त्याच्या गावातून पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून फसवणुकीची चौदा लाख चाळीस हजार रुपयांची संपूर्ण कॅश हस्तगत करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत मोहम्मद वसीम याचा समावश असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सईदाबेगम अब्दुल अकील ही महिला तिचा मुलगा अब्दुल रझाक याच्यासोबत मरिनलाईन्सच्या धोबीतलाव परिसरात राहते तर तिचे पती अब्दुल अकील आणि दुसरा मुलगा अब्दुल रेहमान हे दोघेही त्यांच्या नांदेड येथील गावी राहतात. तिची मुलगी फरहीन बेगम ही बीएएमएसच्या शिक्षणासाठी नाशिक येथे शिक्षण घेत होती. फेब्रुवारी 2022 रोजी ती एल. एन अॅकडमी येथे नीट परिक्षेची ऑनलाईन परिक्षेची तयारी करत होती. याच दरम्यान तिची मोहम्मद वसीम या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. मोहम्मद वसीमने तिला त्याच्या परिचित काही लोक असून ते एमबीबीएससाठी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत करत असल्याचे सांगितले होे. याच लोकांनी त्याचे एम्स रिषीकेश कॉलेजमध्ये अॅडमिशन केल्याचे सांगून त्याच्या अॅडमिशनचे लेटर व्हॉटअप पाठवून तिचा विश्वास संपादन केला होता.
काही दिवसांनी त्याने तिची ओळख निरज आणि रेहान यांच्याशी करुन दिली होती. ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी होते. तिच्या एमबीबीएस प्रवेशासाठी त्यांनी तिच्याकडे आधी 24 लाख आणि चर्चेअंती 21 लाखांमध्ये काम करुन देण्याचे आश्वासन दिले होते. ही माहिती तिने तिच्या आईला सांगितली होती. त्यामुळे तिने तिच्या मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासासाठी या दोघांनाही टप्याटप्याने साडेचौदा लाख रुपये पाठविले होते. फेब्रुवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिच्या मुलीला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला एक वर्ष थांबा, पुढच्या वर्षी नक्की प्रवेश मिळेल असे सांगत होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी तिला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही.
मोहम्मद वसीमने इतर दोन आरोपींशी संगनमत करुन तिच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश देतो असे सांगून तिच्याकडे साडेचौदा लाख रुपये घेतले, मात्र प्रवेश न देता तसेच पैसे परत न करता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच सईदाबेगम अकीलने आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद वसीम, ऐनुल हसन र्ऊ रेहान आणि कृष्णमोहन शर्मा ऊर्फ निरज या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आझाद मैदान पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, पोलीस शिपाई सचिन पाटील, अमरदीप किर्तकर, गोपी पाटील, ज्ञानेश्वर मुंढे यांनी तपास सुरु केला होता. तपासात कृष्णमोहन हा मूळचा दिल्लीचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. काही दिवसांपासून तो पुण्यात राहत असल्याची माहिती समजली होती. या माहितीनंतर त्याला पुण्यातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून एनुल हा उत्तरप्रदेशातील रामपूर, धीरजनगर परिसरात असल्याचे समजताच एक टिम तिथे गेली होती. या टिमने एनुलला त्याच्या गावातून शिताफीने अटक केली. या दोघांनी ही फसवणुक केल्याची कबुली देताना फसवणुकीची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.