रायगडमध्ये सुरु असलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश

आतापर्यंत सहा आरोपींना अटक करुन 24 कोटीचा ड्रग्ज जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर या टोळीने सुरु केलेल्या रायगडच्या एमडी ड्रग्ज कारखान्यावर परिमंडळ सहाच्या एटीएस आणि आरसीएफ पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत एका आरोपीस अटक करुन पोलिसांनी सुमारे 24 कोटीचा एमडी ड्रग्जसहीत ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कच्चा व इतर साहित्य जप्त केला आहे. या गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. त्यापैकी एकजण पोलीस तर उर्वरित पाचजण न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नशा मुक्त गोवंडी अभियानतंर्गत आतापर्यंत परिमंडळ सहाने 42 कोटी 74 लाख 71 हजार 873 रुपयांचा विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

ईशान्य मुंबईत एमडी ड्रग्ज तस्करी करणारी एक सराईत टोळी कार्यरत असून ही टोळी काही तस्कराच्या मदतीने संपूर्ण मुंबई शहरात एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना 19 मार्चला रेहान संतोष शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना साडेचार लाख रुपयांचे 45 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. चौकशीदरम्यान एमडी ड्रग्ज विक्री करणारी एक टोळी असल्याचे सांगितले होते. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आले होते. त्यानंतर त्याच्या चार सहकार्‍यांना मुंबई आणि नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली होती.

या कारवाईत पोलिसांनी 6 किलो 688 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याची किंमत 13 कोटी 37 लाख 60 हजार रुपये इतकी होती. या आरोपींची पोलिसांकडून सतत चौकशी सुरु होती. या चौकशीतून रायगडच्या कर्जत, किकवी परिसरातील सावली फार्म हाऊसची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या ठिकाणी शेळी पालन व्यवसाय करत असल्याचे दाखवून या टोळीने एमडी ड्रग्जचा कारखानाच सुरु केला होता. ही माहिती मिळताच या पथकाने तिथे छापा टाकला हातेा. या कारवाईत पोलिसांनी 11 कोटी पाच लाख रुपयांचा 5 किलो 525 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि एक कोटी रुपयांचा कच्चा माल आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅन्ट आदी साहित्य जप्त केले आहे. यावेळी तिथे असलेल्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मार्च ते मे 2025 दरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणार्‍या एका टोळीसह एमडी ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत सहाजणांना अटक करुन त्यांच्याकडून 24 कोटी 47 लाख 10 हजार रुपयांचा 12 किलो 664 ग्रॅम वजनाचा एमडी, एक कोटीचा ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालक, इलेक्ट्रॉनिक प्लेन्टचे साहित्य जप्त केले आहेत.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बाबशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत साळवी, गणेश कर्चे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय वाणी, पोलीस हवालदार पाटील, खैरे, पोलीस शिपाई येळे, केदार, माळवे, सानप, राऊत, खटके, भावसार, घारे, चौरगे, सुतार, कांबळे यांनी ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page