गॅरेजच्या आड सुरु असलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश
कर्नाटकच्या म्हैसूर येथून 382 कोटीच्या मुद्देमालासह चौघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जुलै 2025
मुंबई, – गॅरेजच्या आड सुरु असलेल्या आणखीन एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश करण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी याच पथकाने वसई येथील ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करुन आठ कोटीचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. आता कर्नाटकच्या म्हैसूर शहातील एमडी ड्रग्जचा पर्दाफाश करुन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणून लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी 381 कोटी 94 लाख रुपयांचा 187 किलो 97 लाखांचे एमडी ड्रग्ज, 45 हजार रुपयांचे दोन ओव्हन, 1 लाख 20 हजार रुपयांचे बारा हिटिंग मशिन, 65 हजार रुपयांचे 168 किलो आयसोप्रोपीलिन अल्कोल, 20 हजाराचे 168 किलो अॅसिटोन, 12 हजाराचे 60 किलो क्लोरोफॉर्म, बाराशे रुपयांचे 24 किलो 950 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट तसेच एमडी बनविण्यासाठी लागणारे प्लास्टिक व काचेचे ट्रे, प्लास्टिक टब, बादल्यासह इतर साहित्य असा 281 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षांत दोन एमडी ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त करुन साकिनाका पोलिसांनी 390 कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चालू वर्षांतील एमडी ड्रग्जची ही आतापर्यंत मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
24 एप्रिल 2025 रोजी साकिनाका परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सादिक शेख आणि सिराज पंजवानी या दोघांना अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यांच्या चौकशीतून त्यांना ते ड्रग्ज काळूराम चौधरीने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर काळूरामला मिरारोड येथून पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून पालघरच्या वसई येथील कामण गावात छापा टाकला होता. यावेळी तिथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या कारखान्यातून पोलिसांनी आठ कोटी 15 लाखांच्या एमडी ड्रग्जसहीत इतर साहित्य जप्त केले होते. या तिघांविरुद्ध नंतर पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. त्यात सलीम शेख या आरोपीस पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सलीम इम्तियाज शेख ऊर्फ सलीम शेख ऊर्फ सलीम लगंडा याला वांद्रे येथून शुक्रवारी 25 जुलैला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत त्याने कर्नाटकच्या म्हैसूर शहरात सुरु असलेल्या अन्य एका ड्रग्ज कारखान्याची माहिती दिली होती. या माहितीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा करण्याचे आदेश साकिनाका पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त संपत पाटील, प्रदीप मैसाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय युवराज क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद काशिनाथ वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज रामधन परदेशी, पोलीस हवालदार शशिकांत हरि पाटील, चंद्रकांत शामराव पवार, नितीन उत्तम खैरमोडे, पोलीस शिपाई अनिल पांडुरंग करांडे आदीचे एक पथक म्हैसूर शहराचे रिंग रोड, सर्व्हिस रोडला लागून असलेल्या निळ्या रंगाच्या शेडजवळ गेले होते. तिथे एक गॅरेज असून त्या गॅरेजच्या आड एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे कारवाई करुन मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसहीत ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य अस 281 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याच गुन्हयांत पोलिसांनी इतर तीन आरोपींना अटक केली. अटकेनंतर जप्त मुद्देमालासह तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे साकिनाका पोलिसांनी वसई आणि म्हैसूर शहरात सुरु असलेल्या दोन एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन्ही कारवाईत पोलिसांनी 192 किलो 530 ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसहीत इतर साहित्य असा 390 कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसहीत इतर मुद्देमाल जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईचे वरिष्ठांकडून साकिनाका पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.