दुबईतून एमडी ड्रग्जचा कारखाना चालविणार्‍या मुख्य आरोपीस अटक

तीन वर्षांत तीन एमडी ड्रग्ज कारखाने सुरु केल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दुबईत वास्तव्यास असताना आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन कारखान्यातून तयार होणारा एमडी ड्रग्जची विक्री कटातील एका मुख्य आरोपीस अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे. याच गुन्ह्यांत सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा याला दुबईतून अटक करण्यात आली असून दुबईतून मुंबईत आणल्यानंतर शेरा याला घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलला देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत शेराने तीन एमडी ड्रग्ज कारखाने सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात एका ड्रग्जच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर इतर चार ड्रग्जच्या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याचा इतर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.

मुंबई सेंट्रल येथे काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने 3 ऑगस्ट 2022 रोजी बेलासिस रोड, नाथानी हाईट्ससमोर साध्या साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद शाहरुख मोहम्मद शफी शेख या 28 वर्षांच्या तरुणाला अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 995 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि सव्वालाख रुपये सापडले होते. या ड्रग्जची किंमत दोन कोटी असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत नंतर इतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत सलमान शेख ऊर्फ शेरा याचे नाव समोर आले होते.

चौकशीदरम्यान शेरा हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या असून तो दुबईत वास्तव्यास असतो. दुबईत राहून तो वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन ड्रग्जची निर्मिती करुन आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. तो दुबईत वास्तव्यास राहत असल्याने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती. तो रेड कॉर्नर नोटीस बजाविलेला आरोपी असल्याचे उघडकीस येताच त्याला दुबईहून भारतात आणण्यात आले होते. दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याला घाटकोपर युनिटकडे सोपविण्यात आले.

शेराविरुद्ध मुंबईसह वेगवेगळ्या राज्यात अनेक ड्रग्जसंबंधित गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 2015 रोजी त्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचा 47 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यानंतर त्याचा चार वेगवेगळ्या ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. घाटकोपर युनिटच्या युनिटने 2023 साली काही ड्रग्जसहीत आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी 72 लाख 62 हजाराचा चरस, केटामाईन आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

2024 रोजी अकोलाच्या बार्शी टाकली पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारखान्यातून 5548 ग्रॅम वजनाचे इपिड्राईनचा साठा जप्त केला होता. त्याची किंमत 1 कोटी 38 लाख 70 हजार रुपये इतका होता. त्याच वर्षी तेलंगणाच्या बीबीनगर पोलिसांनी अन्य एका एका ड्रग्जचा कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी 23 कोटीचा 110 एमडी ड्रग्ज आणि 10 किलो अल्फ्राझोलमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अलीकडेच साकिनाका पोलिसांनी म्हैसर येथून एमडी ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यात कारवाईत केली होती.

या कारवाईत पोलिसाीं 46 कोटीचा 180 किलो एमडी ड्रग्जसहीत ड्रग्जसाठी लागणारे साहित्य जपत केले होते. या चारही गुन्ह्यांत शेरा याचा सहभाग उघडकीस आला होता. दुबईत वास्तव्यास असताना त्याने तिथे एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन कारखान्यातून तयार होणारा एमडी ड्रग्ज आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने विक्री केली होती. या ड्रग्जचा संपूर्ण पैसे त्याला दुबईत पाठविले जात होते. गेल्या तीन वर्षांत त्याने ड्रग्जच्या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्याला याच चारही गुन्ह्यांत पोलिसांकडून अटक केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page