मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मार्च २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट बाराच्या अधिकार्यांनी अटक केली. शबाना इलियास शेख ऊर्फ शब्बो आणि मोहम्मद हनीफ रफिक खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ४२ लाख ७५ हजार रुपयांचे २८५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १ लाख ११ हजार ५०० रुपयांची कॅश, २७ हजार रुपयांचे चार मोबाईल आणि एक डिजीटल वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीचे गुन्हे वाढल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी अशा ड्रग्ज तस्करीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रासकर, पोलीस हवालदार लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शैलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, महिला पोलीस हवालदार कदम, महिला पोलीस शिपाई खाडे यांनी परिसरात गस्त सुरु केली होती. रविवारी मध्यरात्री तीन वाजता गुन्हे शाखेचे पथक गोरेगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी ए. के वैद्य मार्ग, हनुमाननगर येथून शिवमंदिरजवळ पोलिसांना एक महिलेसह दोघेजण संशयास्पद फिरताना दिसली. पोलिसांना पाहताच ते दोघेही पळू लागले. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी पाठलाग करुन या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एमडी ड्रग्जसहीत कॅश, मोबाईल आणि वजनकाटा असा सुमारे ४४ लाखांचा मुद्देमाल सापडला.
हा मुद्देमाल जप्त करुन दोघांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचे नावे शबाना शेख ऊर्फ शब्बो आणि मोहम्मद हनीफ असल्याचे उघडकीस आले. हे दोघेही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार आहेत. शबानाविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात चार तर मोहम्मद हनीफविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात ड्रग्ज तस्करीच्या एका गुन्ह्यांची नोंद आहे. शबानाचा भाऊदेखील ड्रग्ज तस्करीत सक्रिय असून त्यानेच तिला या क्षेत्रात आणले होते. त्यानंतर या दोघांनी मोठ्या प्रमाणात एमडीसह इतर ड्रग्जची विक्री सुरु केली होती. मोहम्मद हनीफ हा या दोघांसाठी ड्रग्ज आणणे, त्याची विक्री करुन पैसे जमा करणे आदी काम पाहत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.
अटकेनंतर रविवारी दुपारी त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी दुजोरा देताना दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. शबाना ही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी आहे. तिच्याविरुद्ध अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीची शहानिशा करुन त्यांच्या इतर सहकार्यांचा शोध सुरु आहे. तिला ते ड्रग्ज कोणी दिले, ड्रग्त ते दोघेही कोणाला विक्रीसाठी घेऊन आले होते याचा तपास सुरु असल्याचे प्रभारी पोलीस नवनाथ जगताप यांनी बोलताना सांगितले.