मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – साकिनाका परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीस ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी बारा लाख रुपयांचे साठ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने मंगळवार ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरु असतानाच साकिनाका येथे एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता तिथे दोन तरुण आले असता त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना साठ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे बारा लाख रुपये इतकी आहे. चौकशीत ते दोघेही तिथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास दत्तात्रय फाळके हे करत आहेत. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, त्यांनी यापूर्वीही एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.