मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सुमारे ७० लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह एका नायजेरीयन महिलेस वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. स्टेला ऊर्फ ट्रेझर पिटर असे या ३४ वर्षीय महिलेचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी ३५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. तिच्यावर एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काही विदेशी नागरिक एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आग्रीपाडा परिसरात येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी युनिटच्या अधिकार्यांनी आग्रीपाडा येथील वायएमसीए रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी तिथे स्टेला पिटर या संशयित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांना ३५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे ७० लाख रुपये इतकी आहे. तपासात स्टेला ही नायजेरीयन नागरिक असून गेल्या काही वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती. तिच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिला ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज ती कोणाला देण्यासाठी आली होती, तिने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे. या गुन्ह्यांत तिचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. तिच्या चौकशीत काही आरोपींची नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.