मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीस काळाचौकी पोलिसांनी अटक केली. समीरभाई हिंमतभाई बाल्लार आणि मोहम्मद शकील अहमद यारमोहम्मद खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी साडेपंधरा लाखांचे 77 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळ काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत भोसले, हसन मुलानी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, पोलीस हवालदार चन्ने, पोलीस शिपाई पवार, नाईकवाडी, कुंभार, कोळेकर यांनी झकेरिया बंदर रोड, वैभव बार अॅण्ड रेस्ट्रॉरंटसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती.
यावेळी तिथे आलेल्या समीरभाई बाल्लार आणि मोहम्मद शकील खान या दोघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 77 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत साडेपंधरा लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यांत ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.