मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – अंधेरी आणि नागपाडा येथून एका महिलेसह तिघांना एमडी ड्रग्जसहीत घाटकोपर आणि आझाद मैदान युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी २१० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ४८ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात सर्वाधिक एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री होत असल्याने अशा तस्कराविरुदध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच अंधेरीतील मरोळ आणि नागपाडा परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना माहिती मिळाली होती. या माहितीनंतर आझाद मैदान युनिटने नागपाडा येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २४ लाख रुपयांचे १२० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ही कारवाई सुरु असताना घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अंधेरीतील मरोळ परिसरातून एका महिलेसह दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी ९० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे आणि घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने केली तर या दोन्ही गुन्ह्यांचा तपास एपीआय अमोल गवळी आणि राघवेंद्र लोंढे हे करत आहेत.
२०२४ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने आतापर्यंत २२ गुन्हे दाखल करुन ५५ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ३४ किलो १५८ ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा तसेच १२०० कोडेनमिश्रीत कफ सिरप बॉटलचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ३० कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षांत एमडी ड्रग्जचे एकूण १५ गुन्हे दाखल करुन ४३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून साडेअकरा किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याची किंमत २२ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.