मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो सांगून ४१ लाखांची फसवणुक
तोतया डॉक्टरसह सासर्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – कळवा येथील राजीव गांधी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून एका मॅकेनिक व्यक्तीची सुमारे ४१ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया डॉक्टरसह त्याच्या वयोवृद्ध सासर्याविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद आबीद अन्सारी आणि कय्युम बोरानिया अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
व्यवसायाने मॅकेनिक असलेले विष्णू रत्नू गुडेकर हे नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतात. ते दुबईतील ऑटोक्राफ्ट मॅकेनिकल सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला आहेत. २०२२ रोजी त्यांची मोठी मुलगी सुविधा ही बारावी उत्तीर्ण झाली होती. तिला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिने नीटची परिक्षा दिली होती. या परिक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. कमी गुण मिळाल्याने तिला कुठल्याही मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या मित्रामार्फत त्यांची कय्युमशी ओळख झाली होती. त्याने त्याचा जावई मोहम्मद आबीद हा डॉक्टर असून तो त्यांच्या मुलीच्या मेडीकल कॉलेजच्या प्रवेशासाठी त्यांना मदत करतील, मात्र त्यासाठी त्यांना तीस लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना मोहम्मद आबीदने कॉल केला होता. त्याने तो स्वत डॉक्टर तसेच नीट या वैद्यकीय प्रवेश स्पर्धा बोर्डाचे प्रमुख असल्याचे सांगितले.
राजीव गांधी मेडीकल कॉलेज येथे एमबीबीएससाठी एक जागा रिक्त असून या जागेवर त्यांच्या मुलीचे काम करतो असे सांगितले. त्यांना प्रवेशासाठी तातडीने एक लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला एक लाख रुपये पाठवून दिले होते. दुसर्या दिवशी मोहम्मद आबीद हा त्यांना भेटला होता. यावेळी त्यांनी त्याला सतरा लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी टप्याटप्याने त्याला ४१ लाख २३ हजार रुपये दिले होते. मात्र ही रक्कम देऊन त्याने त्यांच्या मुलीला मेडीकलमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. तो सतत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. विविध कारण सांगून लवकरच तिचे काम होईल असे सांगत होता. त्याच्याकडून काम होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे मेडीकल प्रवेशासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.
यावेळी त्याने कळवा येथील राजीव गांधी मेडीकल कॉलेजमध्ये तिचे ऍडमिशन झाल्याची पावती दिली होती. ही पावती घेऊन ते कॉलेजला गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या मुलीला प्रवेश मिळाला नसल्याचे समजले. तिथे तिच्या नावाची ऍडमिशनची कुठलीही नोंद नव्हती. मोहम्मद आबीदने ऍडमिशनची दिलेली पावती बोगस असल्याचे तिथे उपस्थित कर्मचार्यांनी सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हा व्यवहार रद्द करुन पैशांची मागणी सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना ३९ लाखांचे धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटताच परत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा दुसरे ४१ लाखांचे धनादेश दिले होते. मात्र ते धनादेशही बँकेत वटले नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर मोहम्मद आबिदचे दोन मित्र वकास मोहम्मद गुलाम मोहम्मद अन्सारी अणि यासीद मोहम्मद कालिन शेख यांनी त्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. पैशांसाठी पुन्हा कॉल करु नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगितले. तसेच त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ४० लाख ३९ हजार रुपये मिळाल्याचे लिहून घेतले.
या प्रकारानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घडलेला प्रकार त्यांनी जे. जे. मार्ग पोलिसांना सांगून मोहम्मद आबिद व त्याचे सासरे कय्युम बोरानिया यांच्याविरुद्ध कट रचून बोगस दस्तावेज तयार करणे, पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे मेडीकलमध्ये प्रवेश देतो असे सांगून इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.