मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणुक
व्यावसायिकाला 33 लाखांना घालणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 डिसेंबर 2025
मुंबई, – चेन्नईतील एका नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये मुलीला प्रवेश देतो असे सांगून एका व्यावसायिकाची दोन भामट्यांनी 33 लाख 53 हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भामट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रॉकी सॅव्हिओ आणि स्टिफन डक्स्टर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही तामिळनाडूच्या चेन्नई शहराचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच चेन्नईला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेझली रॉकी पिंटो हे अंधेरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा स्वतचा शिपिंगचा व्यवसाय होता, सध्या ते व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी कस्टम अधिक्षक म्हणून कामाला आहे. त्यांना एंझल नावाची एक 19 वर्षांची मुलगी असून तिने तीन वर्षापूर्वी बारावीची परिक्षा दिली होती. तिला एमबीबीएसमध्ये प्रवेश हवा होता.
जुलै 2022 रोजी तिने एनईईटीची परिक्षा दिली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिला महाराष्ट्रातील कुठल्याही मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नव्हता. याबाबत त्यांनी त्यांच्या चेन्नईतील नातेवाईकांना माहिती दिली होती. त्यांनी त्यांना रॉकी सॅव्हिओ व त्याचा भागीदार स्टिफन डक्स्टर यांच्याविषयी माहिती दिली होती. त्यांची चेन्नईतील काही मेडीकल कॉलेजमध्ये ओळख असून त्यांनी यापूर्वीही काही तरुणांना कमी गुण मिळाले असताना त्यांना मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे असे सांगितले होते.
सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी या दोघांना संपर्क साधून त्यांच्या मुलीला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याची विनंती केली होती. या दोघांनी त्यांचे काम करण्याचे आश्वासन देत मुलीच्या शैक्षणिकसह वैयक्तिक कागदपत्रांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना तिचे सर्व कागदपत्रे पाठविले होते. यावेळी त्यांनी मेडीकल कॉलेजच्या प्रवेशासाठी तीस लाख, सर्व्हिस चार्ज म्हणून दिड लाख आणि हॉस्टेल फि म्हणून पावणेदोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना 33 लाख 53 हजार पाठविले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांच्या मुलीचे लवकरच प्रवेश होईल तसेच तिला कॉलेजमध्ये कॉल येईल सांगितले होते.
मात्र बराच वेळ होऊन तिला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा तिला कॉलेजमधून कॉल आला नव्हता. त्यामुळे त्यांनी रॉकी सॅव्हिओ आणि स्टिफन डक्स्टर यांना कॉल करुन विचारणा सुरु केली होती. मात्र ते दोघेही त्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत चेन्नईला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना स्टिफन डक्स्टरने एका मेडीकल कॉलेजमध्ये नेले होते. कॉलेजच्या आवारात त्यांना तासभर थांबवून तो आतमध्ये गेला होता.
काही वेळानंतर त्याने त्यांना जानेवारी 2023 रोजी तिला लेटर मिळेल असे सांगून मुंबईत पाठविले होते. मात्र जून 2023 पर्यंत तिला कॉलेजकडून लेटर मिळाले नाही. याच दरम्यान या दोघांनी त्यांचे मोबाईल ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रॉकी सॅव्हिओ आणि स्टिफन डक्स्टर या दोघांविरुद्ध पोलिसांनी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून 33 लाख 53 हजाराचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी पोलिसांची एक टिम चेन्नईला जाणार आहे.