साकिनाका-दादर मेडीकल शॉपमध्ये ३३ लाखांचा घोटाळा
दोन्ही मॅनेजर बंधूविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – विश्वासाने दुकानाची जबाबदारी सोपविलेल्या दोन मॅनेजर बंधूंनीच एका व्यावसायिकाच्या दादर आणि साकिनाका येथील मेडीकल शॉपमध्ये सुमारे ३३ लाखांचा आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॅप्पीसिंग नारायणसिंग दहिया आणि राजूसिंग नारायणसिंग दहिया या दोन्ही बंधूंविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी मूळचे राजस्थानच्या सिरोही, जुनपासवाडाचे रहिवाशी आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
४० वर्षांचे तक्रारदार साकिनाका परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे साकिनाका, मालाड आणि दादर परिसरात चार मेडीकल शॉप आहेत. यातील दादर येथील मेडीकल शॉपमध्ये राजूसिंग हा मॅनेजर म्हणून कामाला होता. हॅप्पीसिंग हा त्याचा भाऊ असून तो साकिनाका येथील मेडीकल शॉपचे कामकाज पाहतो. हॅप्पीसिंग कामावर असताना मेडीकल शॉपमध्ये सुमारे सतरा लाखांचा मेडीसीनचा स्टॉक होता. या शॉपमधून त्यांना दरमहा दोन लाख रुपये नफा मिळतो. तक्रादार आणि या दोन्ही बंधूंमध्ये एक करार झाला होता. त्यात तो त्यांना दरमहा ५० हजार रुपयांसह इतर मेडीकल शॉपचे भाडे भरणार. कामगाराचे पगार आणि दुकानात मेडीसीनचा स्टॉक भरणे आदी सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. दोन महिने वेळेवर पगार दिल्यानंतर त्यांनी त्यांना पैसे देणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा करुन मेडीसीनच्या स्टॉकची पाहणी केली होती. त्यात त्यांना मेडीसीनचा स्टॉक कमी असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून अनेक वितरकाचे पैसे बाकी होते. या दोघांनी त्यांच्या क्यूआर कोड बदलून स्वतचा क्यूआर कोड लावला होता.
हॅप्पीसिंगने साकिनाका तर राजूसिंग मेडीकल शॉपमध्ये अनुक्रमे आठ आणि पंचवीस लाख असा ३३ लाखांचा घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले होते. या पैशांचा अपहार केल्याची कबुली देताना त्यांनी ही रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी ही रक्कम दिली नाही. त्यांनी दिलेले २५ लाखांचे दोन धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीपार्क आणि साकिनाका पोलीस ठाण्यात या दोन्ही बंधूंविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हॅप्पीसिंग आणि राजूसिंग या दोघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.