मेडीकल स्टोरसाठी जागा देण्याची बतावणी करुन फसवणुक

अकरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – जोगेश्‍वरीतील हॉस्पिटलमध्ये मेडीकल स्टोरसाठी जागा देण्याची बतावणी करुन सुमारे अकरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाहनवाज शेख या डॉक्टरविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत डॉ. शाहनवाज याला लवकरच पोलिसाकडून चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आश्‍विन बाबूभाई गोहिल हे कांदिवलीतील क्रॉस रोड क्रमांक चार, नवनाथ सोसायटीचे रहिवाशी आहेत. त्यांनी नाशिकच्या आयटीपी कॉलेजमधून फॉर्मासिस्टची पदवी घेतली आहे. सध्या ते वरळी येथील एका मेडीकल स्टोरमध्ये कामाला आहेत. त्यांनी फॉर्मासिस्टची पदवी घेतल्याने त्यांना स्वतचा मेडीकल शॉप सुरु करायचा होता. त्यासाठी ते जागेचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख डॉ. शाहनवाज शेख यांच्याशी करुन दिली होती. यावेळी शाहनवाजने त्यांना तो जोगेश्‍वरीतील सर्व्हिस रोड, नटवर नगर, साई अर्पन सहकारी सोसायटीच्या तळमजल्यावर आनंद नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल सुरु करणार आहे. या हॉस्पिटलमध्येच त्यांना मेडीकल स्टोरसाठी जागा उपलब्ध करुन देतो असे सांगितले होते. सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच तिथे हॉस्पिटल सुरु होणार आहे. त्यामुळे त्यांनी जागेची पाहणी केली होती. तिथे त्यांना दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे दिसून आले. जागा आवडल्याने त्यांनी तिथेच मेडीकल स्टोर सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या स्टोरसाठी त्यांनी शाहनवाज शेख यांना अकरा लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिे होते. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्याने त्यांच्याकडे आणखीन सात लाखांची मागणी केली होती,  मात्र हॉस्पिटल सुरु झाल्याशिवाय उर्वरित पैसे देणार नाही असे त्यांनी त्याला स्पष्टपणे सांगितले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हॉस्पिटल सुरु केले नाही. त्यांना मेडीकल स्टोरसाठी जागा दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर शाहनवाज शेख विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे अकरा लाखांच्या डिपॉझिटची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना अकरा लाखांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. अशा प्रकारे ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ या कालावधीत शाहनवाज शेखने मेडीकल स्टोरसाठी आश्‍विन गोहिल यांच्याकडून अकरा लाखांचे डिपॉझिट घेऊन त्यांना मेडीकलसाठी जागा दिली नाही, पैशांची मागणी करुनही पैसे परत न करता फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर डॉ. शाहनवाज शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page