मेडीकल स्टोरच्या नावाने तीन डॉक्टरांनी घातला एक कोटीचा गंडा
अपहारासह फसवणुकीप्रकरणी तिन्ही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – भाड्याने जागा घेऊन हॉस्पिटल सुरु करण्याची बतावणी करुन मेडीकल स्टोरसाठी तीन डॉक्टरांनी एका व्यावसायिकाला एक कोटीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टराविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल रहिम रफिकमुल्ला खान, अब्दुल रेहमान अक्रम हुसैन खान आणि तारीक हफिज अबूबकर शेख अशी या तिघांची नावे असून ते तिघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. याच गुन्ह्यांत तिघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अब्दुल कय्युम इक्बाल हुसैन खान हे साकिनाका परिसरात राहत असून ते मेडीकल क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्या मालकीचा साकिनाका परिसरात व्ही केअर केमिस्ट अॅण्ड जनरल स्टोर नावाचे एक दुकान आहे. याच दुकानाच्या पोटमाळ्यावर ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा वडिलांचा न्यू भारत स्क्रॅप कंपनी नावाने भंगारचा व्यवसाय आहे. डॉ. अब्दुल रहिम हे त्यांच्या परिचित असून ते दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांनीच त्यांची ओळख अब्दुल रेहमान आणि तारीक या दोन्ही डॉक्टरशी करुन दिली होती. त्यांनी भाड्याने जागा घेऊन तिथे हॉस्पिटल सुरु करणार असल्याचे सांगितले.
या हॉस्पिटलमध्ये मेडीकल स्टोरची आवश्यकता असल्याने त्यांना मेडीकल स्टोरसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना एक कोटी रुपये डिपॉझिट द्यावे लागतील असे सांगिले. त्यांचा प्रस्ताव आवडल्याने, तसेच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मालकीचा मेडीकल स्टोर असल्याने त्यांना त्याचा चांगला फायदा होणार होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मेडीकल स्टोर सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना टप्याटप्याने डिपॉझिट म्हणून फेब्रुवारी ते जुलै 2024 या कालावधीत 96 लाख रुपये तर फर्निचरसाठी 5 लाख रुपये असे एक कोटी एक लाख दिले होते.
या तिघांनी त्यांना एप्रिल 2024 पर्यंत हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र डिसेंबर महिना उलटूनही त्यांनी हॉस्पिटलचे काम सुरु केले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. विविध कारण सांगून त्यांची दिशाभूल करत होते. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे डिपॉझिटसह फर्निचरसाठी घेतलेल्या एक कोटी एक लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अब्दुल रहिम खान, अब्दुल रेहमान खान आणि तारीक शेख या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिन्ही डॉक्टरांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.