मेडीसीन कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक

अहमदाबादच्या वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – मेडीसीन कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने अहमदाबादच्या एका वयोवृद्धाची दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निशांत खुबालकर या व्यावसायिकाविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने निशांतने इतर काही लोकांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विकास कुमार हे 65 वर्षांचे तक्रारदार अहमदाबादच्या वडोदराचे रहिवाशी असून ते एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांची आरोपी निशांत खुबालकरशी ओळख झाल होती. निशांत हा व्यावसायिक असून त्याची एएनके होल्डिंग नावाची एक कंपनी होती. ही कंपनीत ऑनलाईन मेडीसीन विक्रीचा व्यवसाय करते. कंपनीचा व्यवसाय वाढीसाठी त्याला काही आर्थिक गुंतवणुकदाराची गरज होती. त्यामुळे त्याने विकासकुमार यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.

या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे विकासकुमार यांनी त्याच्या कंपनीत ऑगस्ट 2019 ते जून 2025 या कालावधीत टप्याटप्याने दहा लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र सहा वर्षांत या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा मिळाला नव्हता. याबाबत वारंवार विचारणा करुनही निशांत खुबालकरकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. तो विविध कारणे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. निशांतसोबत व्यवहार न पटल्याने त्यांनी गुंतवणुक केलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती, मात्र पैसे देतो असे सांगूनही त्याने दहा लाख रुपये परत केले नाही.

निशांतकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच विकासकुमार यांनी आझाद मैदान पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निशांतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. निशांतने विकासकुमार यांच्यासह इतर काही लोकांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page