औषधांच्या 21 लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन फसवणुक
कंपनीच्या सेल्समन कर्मचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – औषधांच्या सुमारे 21 लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन एका खाजगी मेडीकल कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी सेल्समन शाहिद फक्रुद्दीन सय्यद याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2023 ते 2025 या कालावधीत शाहिदने हा आर्थिक घोटाळा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत लवकरच शाहिदची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
सिद्धार्थ विमल त्रिवेदी हा औषधांचा वितरक असून तो घाटकोपर परिसरात राहतो. त्याचा घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा, कोहीनूर टेक्सटाईल्स प्रिटींग कंपाऊंडमध्ये मेडोसिन डिस्ट्रिब्युटर नावाचा औषधांचा वितरणाचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे पंधरा कामगार कामाला असून त्यात शाहिद हा सेल्समन म्हणून काम करतो. कुर्ला येथे राहणारा शाहिद हा 2017 साली डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला लागला होता. नंतर त्याला सेल्समन म्हणून बढती देण्यात आली होती. तो कुर्ला, सांताक्रुज, वरळी, भायखळा, डोंगरी आदी ठिकाणी त्यांच्या कंपनीच्या औषधांचे प्रमोशन करुन औषधांची विक्री कत होता. त्याच्याकडे विविध साठहून अधिक कंपन्याच्या औषधांच्या विक्रीसह त्यातून आलेले पेमेंट कंपनीत जमा करण्याची जबाबदारी होती.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत सिद्धार्थने वरळीतील मेडीकल स्टोरचे मालक अस्लमभाई यांना कॉल करुन त्यांना पेंडिंग बिलाबाबत विचारणा केली होती. यावेळी अस्लमभाईने शाहिदला कॅश पेमेंट केल्याचे सांगितले. त्यानंतर सिद्धार्थने इतर मेडीकल शॉपमध्ये विचारणा केली असता त्यांनीही शाहिदला पेमेंट केल्याचे सांगितले. मात्र ही कॅश शाहिदने कंपनीत जमा केली नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी औषधांच्या पेमेंटबाबत चौकशी केली असता शाहिदकडून साडेतेरा लाखांचे पेमेंट आले नसल्याचे दिसून आले. याबाबत त्याला विचारणा केल्यानंतर त्याने त्याची चूक मान्य करुन लवकरात लवकर ही रक्कम कंपनीत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्याला नोकरीवरुन काढून टाकू नका अशी विनंती केली होती.
त्याचा कामाचा अनुभव पाहता सिद्धार्थने त्याला कामावरुन काढले नाही. 20 मार्चला शाहिद हा नातेवाईकाच्या निधनाचे कारण सांगून कंपनीतून पाच हजार रुपये घेऊन बंगलोरला गेला होता. त्यानंतर तो परत आला नाही. याच दरम्यान सिद्धार्थने शाहिदच्या सर्व आर्थिक व्यवहाराची पाहणी सुरु केली होती. त्यात त्यांना 2023 ते मार्च 2025 या कालावधीत शाहिदने 21 लाख 12 हजार 601 रुपयांचे पेमेंट घेऊन या पेमेंटचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.
शाहिदने कुर्ला, सांताक्रुज, वरळी, भायखळा, डोंगरीतील विविध मेडीकल शॉपमधून कॅश आणि ऑनलाईन पेमेंट घेतले होते, मात्र ही रक्कम कंपनीत जमा केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच सिद्धार्थ त्रिवेदीने पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर शाहिदविरुद्ध पोलिसांनी औषधांच्या पेमेंटचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.