मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घातक शस्त्रांसह एका ४० वर्षांच्या चालकाला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांकडून दहा लाखांची कॅश, एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसाचा साठा जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जोगेश्वरी परिसरात काहीजण घातक शस्त्रांसहयेणार असल्याची येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ व पोलीस शिपाई दत्तात्रय बागुल यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ, पोलीस हवालदार माने, पोलीस शिपाई दत्तात्रय बागुल, माने यांनी जोगेश्वरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, रामगड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री दहा वाजता तिथे एक व्यक्ती आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे नाव गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद असल्याचे उघडकीस आले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना शंभर रुपयांच्या ८२०० तर दोनशे रुपयांच्या ९०० नोटा अशा दहा लाखांची कॅश, एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा कट्टा, सहा जिवंत काडतुसासह इतर मुद्देमाल सापडला.
तपासात गौस हा जोगेश्वरीतील प्रेमनगर, बाळ विकास शाळेजवळील अब्दुल हमीद चाळीत राहत असून चालक म्हणून काम करतो. तो जोगेश्वरीतील रामगढ परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने ते शस्त्रे कोठून आणले, त्याला ती शस्त्रे कोणी दिली आणि तो कोणाला देणार होता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.