बोलबच्चन करुन सोन्याचे पळविणार्‍या सासू-जावयाला अटक

मुख्य आरोपीविरुद्ध 25 हून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – बोलबच्चन करुन रस्त्यावरुन जाणार्‍या महिलांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने पळविणार्‍या एका टोळीचा मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. लता बाबूनाथ काळे आणि बापू रमेश पवार ऊर्फ आकाश अशी या दोघांची नावे असून यातील लता काळे ही बापूची सासू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बापू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच 25 हून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

75 वर्षांची वयोवृद्ध महिला सुरेखा सुरेश मयेकर ही जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात राहते. 21 ऑगस्टला ती कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आली होती. यावेळी तिथे आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींशी तिच्याशी गोड बोलून बोलबच्चन करण्याचा प्रयत्न केला. तिला दोनशे रुपयांसह बिस्कीट दिले होते. त्यानंतर तिला आर्थिक मदतीचा बहाणा करुन तिला तिच्या अंगावरील दागिने काढण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर तिची दिशाभूल करुन सुमारे पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच तिने मेघवाडी पोलिसांत तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

मुंबई शहरात अशा प्रकारे फसवणुक करणार्‍या काही टोळ्या सक्रिय असल्याने या आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांना दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक फौजदार गोविंद पवार, पोलीस हवालदार राजेश ठाकूर, गुरुनाथ राठोड, पोलीस शिपाई अविनाश कापसे, अमीत लाडे, अक्षय सातपुते, शुभम खरात, पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी तपास सुरु केला होता.

पन्नासहून सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी बापू पवार याला भांडुप येथील टेंभीपाडा परिसरातून अटक केली. चौकशीत तो अशा प्रकारे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 25 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने इतर सहकार्‍यांच्या मदतीने सुरेखा मयेकर यांचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. ते दागिने त्याने त्याची सासू लता काळे हिच्याकडे ठेवले होते. त्यानंतर तिच्या घरातून पोलिसांनी चोरीचे दागिने ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत लताचा सहभाग उघडकीस येताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page