नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन भीक मागण्यास प्रवृत्त केले

गुन्हा दाखल होताच 18 वर्षांच्या तरुणीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – आजारी असलेल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीचे अपहरण करुन तिला प्लास्टिक गोळा करण्यास तसेच अंधेरी रेल्वे स्थानकासह अंधेरी-माहीमदरम्यान लोकलमध्ये भीक मागण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 18 वर्षांच्या आरोपी तरुणीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. समरीन बशीर हुसैन शेख असे या तरुणीचे नाव असून अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

47 वर्षांचे तक्रारदार अंधेरी परिसरात त्यांची पत्नी, विवाहीत मुलगा, सून आणि नऊ वर्षांच्या मुलगी शबाना (नावात बदल) यांच्यासोबत राहतात. ते एका व्यक्तीकडे चालक म्हणून कामाला आहे तर त्यांचा मुलगा हॉटेलमध्ये काम करतो. सोमवारी दुपारी शबानाला ताप आला होता, त्यामुळे ती घरातच आराम करत होती. काही वेळानंतर तिची मैत्रिण समरीन त्यांच्या घरी आली होती. काही वेळानंतर समरीन ही शबानाला घेऊन बाहेर निघून गेली होती. त्या दोघीही परिसरात असतील म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र बराच वेळ होऊन शबाना घरी आली नाही. त्यामुळे तिने तिच्या तक्रारदार सासरे आणि पतीला हा प्रकार सांगितला. या घटनेनंतर ते दोघेही घरी आले आणि त्यांनी शबानाचा शोध सुरु केला होता. मात्र ती कुठेच सापडली नाही.

सायंकाळी साडेसात वाजता त्यांचा मुलगा शबाना आणि सिमरनला घेऊन त्यांच्या घरी आले. यावेळी शबानाकडे विचारपूस केल्यानंतर तिने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. मात्र नंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. समरीन तिला घरातून काम असल्याचे सांगून बाहेर घेऊन गेली. त्यानंतर तिने तिला प्लास्टिक बॉटल गोळा करण्यास सांगितले. काही बॉटल जमा केल्यानंतर त्यांनी त्याची विक्री केली होती. या विक्रीतून तिने तिला एक रुपया दिला होता. यावेळी शबानाने तिला भूक लागल्याचे सांगून घरी सोडण्यास सांगितले.

मात्र ती तिला घरी घेऊन न जाता सुभाषनगर येथे घेऊन आली. तिथेच तिने तिला भीक मागण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर ते दोघीही अंधेरी रेल्वे स्थानकात आले. तिथेही तिने तिला भीक मागण्यास सांगितले. काही वेळानंतर अंधेरी-माहीम रेल्वे स्थानकादरम्यान तिने तिला लोकलमध्ये प्रवाशांकडून पैसे मागण्यास प्रवृत्त केले होते. माहीम येथून ते दोघेही पुन्हा जोगेश्वरी रेल्वे स्थानकात आले. रिक्षातून घरी जात असताना तिला तिचा भाऊ भेटला आणि त्यांनी तिला घरी आणले. शबानाकडून ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

या घटनेनंतर त्यांनी शबानाला मेघवाडी पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी समरीन शेखविरुद्ध अपहरणासह तिला भीक मागण्यास प्रवृत्त करणे, अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी दुपारी सव्वा ते सायंकाळी सव्वासात वाजता घडलेला प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page