मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सोळा वर्षांच्या अल्पवयीन भाचीवर तिच्याच मानलेल्या मामाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल हातेाच ३२ वर्षांच्या आरोपी मामाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
१६ वर्षांची पिडीत मुलगी जोगेश्वरी परिसरात राहत असून ती सध्या शिक्षण घेत आहे. आरोपी हा तिचा मानलेला मामा असून तोदेखील तिच्यासोबत राहतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा तो तिच्या शेजारी झोपून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर त्याने जोगेश्वरीतील राहत्या घरासह सिंधुदुर्गच्या कणकवलीतील गावी तिच्यावर सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीत अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. यावेळी त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कोणालाही सांगून नकोस असे सांगितले होते. गुरुवारी १ ऑगस्टला तिने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर ते तिला घेऊन मेघवाडी पोलीस ठाण्यात आले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने तिच्याच मानलेल्या मामाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपी मामाविरुद्ध ३७६, ३७६ (२), (एन), ३५४, ५०६ भादवी सहकलम ४, ६, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गुरुवारी रात्री उशिरा आरोपीस त्याच्या जोगेश्वरीतील राहत्या घरातून पोलिसंनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.