मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या आमिषाने एका ७७ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक झाल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पिता-पूत्राविरुद्ध डोंगरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परवेज हमीद खान आणि फरहान परवेज खान अशी या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार वयोवृद्ध हे त्यांच्या कुटुंबियांसोबत डोंगरी येथे राहतात. त्यांचा मुलगा २००२ ते २०१८ या कालावधीत मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होता. २०१८ साली नोकरी कमी झाल्याने त्याने स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र या व्यवसायात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने पुन्हा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले ाहेते. याच दरम्यान त्यांची ओळख परवेज आणि त्यांचा मुलगा फरहान यांच्योबत झाली होती. या दोघांनी त्यांच्या मुलाला मर्चंट नेव्हीमध्ये डेक ऑफिसर पदासाठी नोकरीचे आश्वासन देत काही खर्च येईल असे सांगितले होते. डेक ऑफिसर पदाची नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यांना होकार दिला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मुलाचे शैक्षणिक तसेच वैयक्तिक कागदपत्रे, सीडीसी, पासपोर्ट आणि बेसिक कोर्सचे प्रमाणपत्र दिले होते. तसेच नोकरीसाठी त्यांनी खान पिता-पूत्रांना साडेसात लाख रुपये दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाच्या नियुक्तीचे पत्र लवकरच घरी पाठविले जाईल असे सांगितले होते. मात्र दोन महिने उलटूनही त्याला नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेले कागदपत्रे आणि साडेसात लाख रुपये परत करण्यास सांगितले.
काही दिवसांनी त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. वारंवार पैशांची मागणी करुनही या दोघांनी पैसे परत न करता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. खान पिता-पूत्राकडून झालेल्या फसवणुकीनंतर त्यांनी डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर परवेज खान व त्याचा मुलगा फरहान खान यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.