भाडे म्हणून वसुल केलेल्या पावणेसहा कोटीचा अपहार करुन फसवणुक

म्हाडाच्या वरिष्ठ लिपीक व भाडे वसुलीकाराविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मार्च 2026
मुंबई, – पुर्नरचित इमारतीमधील गाळ्यांचे आणि संक्रमण शिबीरमधील गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम करताना वसुल केलेली रक्कम म्हाडाच्या बँक खात्यात जमा न करता सुमारे पावणेसहा कोटीचा परस्पर अपहार करुन म्हाडाची त्यांच्याच कार्यालयातील एका अधिकार्‍याने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ लिपीक असलेल्या भाडे वसुलीकार जगदीश परशुरामजी धार्मिक याच्याविरुद्ध दादर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून जगदीशला चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार आहे.

प्रमोद ज्ञानबा कांबळे हे चेंबूरच्या सेल कॉलनीत राहत असून गेल्या तीन वर्षांपासून ते वरळीतील स्वतंत्र सैनिक भवन, मिळकत व्यवस्थापक परिमंडळ चार कार्यालयात मिळकत व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्यावर पुर्नरचित इमारतीमधील भाडेकरु रहिवाशांकडून भाडे आणि सेवा शुल्क वसुली, निवासी-अनिवासी सदनिकांचे हस्तांतरण-नियमितीकरण करणे, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे आदी कामाची जबाबदारी आहे. काही वर्षांपासून पुर्नरचित इमारतीच्या रहिवाशांकडून गाळ्याचे वसुल केलेले भाडे चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाले होते. या तक्रारीनंतर कार्यालयातील भाडे वसुलीकार तसेच वरिष्ठ लिपीक जगदीश धार्मिक यांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

काही दिवसांनी त्यांनी त्याचा खुलासा केला होता, मात्र पुर्नरचित इमारतीच्या रहिवाशांकडून सादर केलेल्या भाडे पावतीची पाहणी केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत होते. जगदीश धार्मिक आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या पावतीमधील रक्कम प्रचंड तफावत दिसत होती. त्यामुळे प्रमोद कांबळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी एक समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात लेखा अधिकारी एन. आर रंगाली, विभागीय लेखापाल सिमा मयेकर, मिळकत व्यवस्थापक प्रविण बागुल आणि सहाय्यक सी. डी घडले यांचा समावेश होता.

चौकशीत 2023 सालापासून जगदीश धार्मिक हे फ दक्षिण विभागातील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुर्नरचना मंडळ येथे भाडे वसुलीकार म्हणून काम करत होते. त्याने त्यांच्या कार्यकाळात जवळपास 22 हजार 209 भाडे पावत्या रहिवाशांना दिल्या होत्या. त्यापैकी 13 हजार 551 पावती रेमिटंस कार्यालयात जमा करण्यात आल्या. उर्वरित 8 हजार 658 भाडेपावत्याचा कुठेही उल्लेख किंवा नोंद नव्हती. त्यामुळे संबंधित इमारतीमध्ये भाडेकरु रहिवाशांकडून 3 हजार 3368 पावत्यामधील रक्कम आणि रेमिटंसप्रमाणे भरण्यात आलेली रक्कमेत प्रचंड तफावत होती. प्राथमिक तपासात 53 लाख 26 हजार 640 रुपयांचा हिशोब मिळून आला होता.

या पैशांचा जगदीशने परस्पर अपहार वकक्षररुन कार्यालयाची फसवणुक केली होती. त्यामुळे जगदीशने सादर केलेल्या 13 हजार 551 भाडे पावती आणि रेमिटंसची पुन्हा पाहणी करण्यात आली होती. त्यात जगदीशने कार्यालयातील 5 कोटी 70 लाख 67 हजार 928 रुपयांचा परस्पर अपहार केल्याचे उघडकी आले होते. याबाबत एक गोपनीय अहवाल समिती सभासदांनी वरिष्ठांना सादर केला होता. या अहवालात 2015 ते 2023 या कालावधीत वरिष्ठ लिपीक असलेले भाडे वसुलीकार जगदीश धार्मिक याने मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुर्नरचना मंडळ अंतर्गत मिळकत व्यवस्थापक परिमंडळ चार येथे कार्यरत असताना पुर्नरचित इमारतीमधील गाळ्यांचे आणि संक्रमण शिबीरमधील गाळ्यांचे भाडे वसुली करताना वसुली केलेली रक्कम म्हाडाच्या खात्यात जमा न करता स्वतकडे ठेवून 5 कोटी 70 लाख 67 हजा 928 रुपयांचा अपहार केल्याचे नमूद करण्यात आले होते.

त्यातून म्हाडाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यामुळे वरिष्ठांनी जगदीश धार्मिकविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रमोद कांबळे यांना दिले होते. या आदेशानंतर त्यांनी दादर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी जगदीश धार्मिकविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांची त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page