मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बोगस वेबसाईट बनवून म्हाडाच्या अर्जदाराकडून बोगस वेबपोर्टलद्वारे पैसे स्विकारुन फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेसह पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन भामट्यांना सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल अशी या दोघांची नावे असून यातील कल्पेशने म्हाडाची बोगस वेबसाईट तयार केली होती तर अमोल हा स्वतला म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून अर्जदारांकडून वेबपोर्टलवर पैसे जमा करण्यास प्रवृत्त करत होता. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी आतापर्यंत सात अर्जदारांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलीकडेच म्हाडाच्या वतीने सायबर सेल पोलिसांत एक तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यात काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाची बोगस वेबसाईट बनवून अर्जदारांना पैसे भरण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी या आरोपीविरुद्ध ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ६१ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (क), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत उत्तेकर, पोलीस शिपाई तकिक, देसाई, जाधव, युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, सहाय्यक फौजदार भुजबळ, पोलीस हवालदार पाटील, युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक भिसे, युनिट तीनचे पोलीस हवालदार अनुभूले, बिडवे यांनी तपासाला सुरुवात केली होती.
तपासात गोरेगाव येथील म्हाडाचे घर देतो असे सांगून एका व्यक्तीला बोगस वेबसाईटवर पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. पैसे भरल्यानंतर त्याला म्हाडाची बोगस पावती देण्यात आली होती. ही पावती बोगस असल्याचे लक्षात येताच अर्जदाराने म्हाडा कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सोशल मिडीयावर म्हाडाची बोगस वेबसाईट असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे याच माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्पेशला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत अमोलचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला नालासोपारा येथून पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यासची माहिती मिळताच ते दोघेही सावध झाले होते. अटकेच्या भीतीने ते दोघेही त्यांच्या वास्तव्याची जागा सतत बदलत होते. चौकशीत ते दोघेही म्हाडाचे एजंट म्हणून काम करतात. अमोलचे बारावी तर कल्पेशचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी अनेकांना म्हाडाचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून ते तक्रारदारांना म्हाडा इमारतीच्या बांधकाम साईटवर बोलवत होते.
आपण म्हाडाचे अधिकारी असल्याचे सांगून ते तक्रारदारांचा विश्वास संपादन करत होते. त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत करुन त्यांना त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यानंतर त्यांना म्हाडाची बोगस पावती दिली जात होती. अमोलकडून पोलिसांनी एक डायरी जप्त केली असून त्यात ६५ जणांचे नाव आहेत. त्याच्याकडून एक मोबाईल, म्हाडा सदनिका लॉटरीचे झेरॉक्स जप्त केले आहे. म्हाडाच्या घरासाठी त्यांच्याकडे अनेक इच्छुकांनी विनंती केली. या गोष्टींचा फायदा घेऊन त्यांनी बोगस वेबसाईट तयार करुन ही फसवणुक करण्यास सुरुवात केली होती. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे. या दोघांच्या बँक खात्यात आतापर्यंत किती रुपये जमा झाले याची माहिती काढली जात आहे. त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत, फसवणुकीच्या पैशांचे त्यांनी काय केले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.