मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने एका व्यक्तीला गंडा घातल्याप्रकरणी मेराज कददन खान या ४८ वर्षांच्या आरोपीस आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मेराजविरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत त्याला यापूर्वी आंबोली पोलिसांनी अटक केली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याचा बांधकाम व्यावसायिक सहकारी मोहम्मद अनिस शौकत शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या साडेचौदा लाखांचा अपहार करुन तकारदाराची फसवणुक केल्याचा या दोघांवर आरोप आहे.
साजिद इम्तियाज अहमद हे अंधेरीतील गांधीनगरच्या श्रीरामवाडी एसआरए अपार्टमेंटमध्ये राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांची मेराज आणि मोहम्मद अनिस यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांना म्हाडाच्या श्रीरामवाडी अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावर स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी फ्लॅट घेण्याची तयारी दर्शवून त्यांना फ्लॅटसाठी सप्टेंबर २०१९ ते मे २०२४ या कालावधीत सुमारे साडेचौदा लाख रुपये दिले होते. मात्र पाच वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे मिळवून दिली नव्हती. वारंवार विचारणा करुनही या दोघांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. फ्लॅटसाठी घेतलेल्या साडेचौदा लाखांचा अपहार करुन या दोघांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी २३ मे २०२४ रोजी मेराज खान आणि मोहम्मद अनिस यांच्याविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना २०२१ साली मेराजविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात ३७७, ३७६, ३४२, ३२८, ३२३, ५०६ (२), ३४ भादवी सहकलम ४, ६, ८, १२, १७ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला काही दिवसांनी पोलिसांनी पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या मेराजची दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टातून कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केल्यानंतर त्याला गुरुवारी फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहकारी मोहम्मद अनिस शौकत शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार साजिद अहमद यांनी या दोघांना साडेचौदा लाख रुपये दिले होते. त्यापैकी साडेसात लाख रुपये मेराजला तर सात लाख रुपये मोहम्मद अनिसला मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.