म्हाडा फ्लॅटच्या नावाने गंडा घालणार्या भामट्याला अटक
गुन्ह्यांत आरोपीची मुलगी सहआरोपी; तिचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याप्रकरणी अरविंद प्रभाकर कुलकर्णी नावाच्या एका भामट्याला सात महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अरविंदची मुलगी रेणुका अरविंद कुलकर्णी सहआरोपी असून या दोघांनी म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याची बतावणी करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रेणुका कुलकर्णी हिचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हर्षा सखाराम मेंदाडकर हे बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. याच परिसरात अरविंद हा त्याची मुलगी रेणुका हिच्यासोबत राहतो. त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय असून त्यांच्याकडून ते दूध घेत असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. याच दरम्यान अरविंदने त्याची म्हाडा विभागात चांगली ओळख असून त्यांना म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. गुतवणुक म्हणून त्यांनी फ्लॅट खरेदी करुन नंतर त्याची विक्री केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. त्याच्याावर विश्वास ठेवून त्यांनी म्हाडाचे फ्लॅटचे घेण्याचे ठरविले होते.
याच दरम्यान या दोघांनी त्यांना बोरिवली परिसरातील एका म्हाडा इमारतीमधील फ्लॅट दाखविला होता. हाच फ्लॅट त्यांना 55 लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना बँकेतून गृहकर्ज मिळवून देण्यासाठी मदत करतो असेही सांगितले होते. त्यामुळे त्यांनी जून ते जुलै 2021 या कालावधीत अरविंद आणि रेणुका कुलकर्णी यांना नऊ लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी लवकरच फ्लॅटचे अलोटमेंट लेटर देतो असे सांगितले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी अलोटमेंट लेटर दिले नाही. प्रत्येक वेळेस ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. चौकशीदरम्यान अरविंद आणि रेणुका यांचा म्हाडा कार्यालयाशी काहीही संबंध नसून त्यांना कोणीही अधिकारी ओळखत नव्हता.
केवळ फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याची बतावणी करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र त्यांनी पैसे दिले नाही. गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडून केवळ आश्वासन देण्यात येत होते, मात्र त्यांनी फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. त्यामुळे हर्षा मेंदाडकर यांनी अरविंद व त्यांची मुलगी रेणुका यांच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होात. याच गुन्ह्यांत सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अरविंद कुलकर्णी याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने हर्षा मेंदाडकर यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.