म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक
२२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने ३३ वर्षीय व्यक्तीची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदानंद मंडाला आणि संतोष मंडाला अशी या दोघांची नावे असून या दोघांवर फ्लॅटसाठी घेतलेल्या २२ लाख २५ हजाराचा अपहार केल्याचा आरोप आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्रांत प्रकाश गार्डी हे टिटवाळा येथील गणेशनगर सोसायटीच्या अभिनंदन होम्स अपार्टमेंटमध्ये राहत असून मोनोरेलमध्ये कंट्रोलर म्हणून कामाला आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची सदानंद आणि संतोष मंडाला यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर या दोघांनी त्यांना दादरच्या रुबी मिलमध्ये मिल कामगारासाठी असलेला म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. हा फ्लॅट जगजीवन तन्ना यांच्या मालकीचा असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन पॉवर ऑफ ऍटनी घेऊन फ्लॅटचा ताबा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून विक्रांत गार्डी यांनी सदानंद आणि संतोष मंडाला जानेवारी २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत २२ लाख २५ हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटसह पॉवर ऑफ ऍटनीचे कागदपत्रे दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी या दोघांकडून फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही.
तीन वर्ष उलटूनही या दोघांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सदानंद आणि संतोष मंडाला या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.