म्हाडाच्या घरासह गाळा व मेडीकल शॉपसाठी 74 लाखांचा अपहार
अपहारासह फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मंत्री कोट्यातून म्हाडाच्या घरासह व्यावसायिक गाळा तसेच कूपर आणि सायन हॉस्पिटलमध्ये भाड्याने मेडीकल शॉप देण्याचे आमिष दाखवून बोरिवलीतील एका मेडीकल व्यावसायिकाची सुमारे 74 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदित्य सरफरे ऊर्फ विजेंद्र या भामट्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या भामट्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
इतेश कमिच्छा गुप्ता हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे बोरिवली परिसरात बालाजी नावाचे एक मेडीकल शॉप आहे. जुलै 2023 रोजी त्यांची आदित्यशी एका मित्रामार्फत ओळख झाली होती. तो गोरेगाव येथे राहत असून त्याने त्याच्या मुलीला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्याची मंत्रालयापासून म्हाडा विभागात चांगली ओळख आहे. त्याने अनेकांना म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून दिले आहेत. त्यांच्या पत्नीलाही त्याने म्हाडाचा घर दिल्याचे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना पत्नीला अलोट झालेल्या म्हाडाच्या घराचे कागदपत्रे दाखविले होते. त्यामुळे त्यांनी आदित्यला भेटण्याचा आग्रह केला होता. ठरल्याप्रमाणे ते त्यांच्या मित्रासोबत आदित्यला भेटण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर त्यांची मैत्री झाली होती. याच दरम्यान त्याने त्यांना म्हाडाची लवकरच लॉटरी निघणार असून त्यांना मंत्र्याच्या कोट्यातून म्हाडाचे घर किंवा गाळा देण्याचे आश्वासन दिले होते.
या कामासाठी त्याने त्यांच्याकडे साडेपंधरा लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्याने म्हाडा कार्यालयात भरल्याची पावती दिली होती. त्यानंतर घरासह गाळ्याच्या नावाने त्यांना विविध कारण सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होता. याच दरम्यान त्याने त्यांना कूपर आणि सायन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासह त्यांच्या भाऊ राजेश गुप्ता यांना भाड्याने मेडीकल शॉप देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. कूपर आणि सायन हॉस्पिटलमध्ये भाड्याने मेडीकल शॉप मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यासाठी त्यांनी त्याला 40 लाख रुपये दिले होते. त्यांची ऑर्डर मंत्रालयातून निघणार असून त्यासाठी त्यांना काही रक्कम मोजावे लागतील. अधिकार्यांना पैसे देऊन त्यांचे काम लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला आणखीन पैसे दिले होते.
काही दिवसांनी त्याने त्यांना म्हाडाच्या घरासह कूपर आणि सायन हॉस्पिटलमध्ये भाड्याने मेडीकल शॉपचे पेमेंट केलेले पावती, अॅलोटमेंट लेटर, अग्रीमेंट कॉपी आदीचे दस्तावेजाचे झेरॉक्स प्रत दिले होते. त्याच दिवशी त्याने त्यांच्याकडून कार खरेदीसाठी उसने आठ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने म्हाडाचे घर दिले नाही किंवा मेडीकल शॉपचा ताबा दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना दरमाह दहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते, मात्र त्याने ही रक्कम त्यांना दिली नाही.
अशा प्रकारे आदित्य सरफरे याने जुलै 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मंत्री कोट्यातून म्हाडाचे घर, व्यावसायिक गाळा तसेच कूपर व सायन हॉस्पिटलमध्ये भाड्याने मेडीकल शॉप देतो असे सांगून त्यांच्याकडून 74 लाख 45 हजार रुपये घेतले होते, मात्र घरासह गाळा तसेच मेडीकल शॉपचा ताबा न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदित्य सरफरे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याच्या चौकशीतून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा खुलासा होणार आहे.