म्हाडाच्या घरासाठी शिक्षिकेसह दोघांची 26 लाखांची फसवणुक
फ्लॅटच्या पैशांचा अपहारप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – म्हाडाच्या घरासाठी एका शिक्षिकेसह तिच्या पतीच्या मित्राची त्यांच्याच परिचित आरोपीने सुमारे 26 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फ्लॅटचा पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अरविंद शांताराम चाळेकर या आरोपीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंदने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
विद्या गणेश उगले ही 50 वर्षांची महिला तिच्या पती आणि मुलीसोबत काळाचौकी परिसरात राहते. ती घाटकोपर येथील भटवाडीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून तर तिचे पती बोरिवली येथे कामाला आहे. 2019 साली त्यांच्या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता. तिथे तिची तिच्या पतीचा शाळेचा मित्र अरविंद चाळेकरशी ओळख झाली होती. या ओळखीत तो म्हाडाच्या मास्तर फाईचे काम करतो. त्याची म्हाडाच्या मोठमोठ्या अधिकार्यांशी चांगले संबंध आहे. त्याचा एक एजंट मित्र असून त्याच्या मदतीने त्याने आतापर्यंत काळाचौकी आणि परळ येथे म्हाडाची रुम 50 ते 55 लाखांना दिली आहे असे सांगितले होते. त्यांना मुंबईत स्वतच्या मालकीचे एक घर घ्यायचे होते, त्यामुळे त्यांनी अरविंदच्या मदतीने म्हाडाचा फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी त्यांनी अरविंदशी सविस्तर चर्चा करुन त्यांना म्हाडाचा स्वस्तात घर मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानेही त्यांना म्हाडाचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्याला 1 जानेवारी 2022 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत कॅश आणि ऑनलाईन 20 लाख 47 हजार रुपये दिले होते. म्हाडाच्या घरासाठी तिच्या पतीचा मित्र महेश परब यानेही त्याला पावणेसहा लाख दिले होते. मात्र ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्यांना म्हाडाच्या घराचे कागदपत्रे दिली नाही किंवा कुठल्या म्हाडा अधिकार्याशी भेट घडवून आणली नव्हती. त्यांनी दिलेले पैसे म्हाडा अधिकार्यांना दिले आहेत, लवकरच त्यांच्या घराचे काम होईल असे सांगून तो वेळ मारुन नेत होता. त्यामुळे त्यांनी हा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
यावेळी त्याने तीन महिन्यांत म्हाडाचे घर किंवा घरासाठी दिलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्याने त्यांना एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. हा प्रकार अरविंदला सांगून त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी अरविंद हा पैशांची मागणी केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत होता. अशा प्रकारे अरविंद चाळेकर याने म्हाडाच्या घरासाठी तक्रारदार महिलेच्या पतीसह मित्राकडून 26 लाख 23 हजार घेऊन म्हाडा घर न देता त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर विद्या उगले हिने काळाचौकी पोलिसांत अरविंदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.