म्हाडासह रोड कटींगच्या फ्लॅटच्या आमिषाने 1.80 कोटीचा गंडा
पंधराजणांविरुद्ध गुन्हा तर कारचालकाला म्हाडा अधिकारी बनविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – म्हाडामध्ये दहा टक्के कोट्यातून तसेच रोड कटींगमध्ये गेलेला रुम स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून अकराजणांची 1 कोटी 80 लाखांची एका टोळीने फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी ऋतुजा मोडक व तिच्यासाठी पैसे स्विकारणारे राजेश इंटरप्रायजेस, राजेश तिवारी, विकी मोरे, अनुज साटम, अभिषेक बिल्ले, विठ्ठल टान्सपोर्ट, रुपाली साटम, विनित बनसोडे, अनिल पांडे, सागर कणसे, योगेंद्र पांडे, अजीत मोरे, विनित पवार आणि विनय पांडे यांच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऋतुषाने तिच्या कारचालकाला म्हाडा अधिकारी बनवून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले.
69 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार शांताराम सखाराम तोरस्कर हे काळाचौकी परिसरात राहतात. ते एमटीएनएलमधून निवृत्त झाले आहेत. 2021 साली त्यांना मुंबईमध्ये एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकासह मित्रांना सांगितले होते. याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची ऋतुजा मोडकशी ओळख करुन दिली होती. तिने त्यांना रोड कटींगमध्ये किंवा म्हाडाच्या दहा टक्के कोट्यातील फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून तिने त्यांना शिवडीतील झकेरिया बंदर रोड, ज्युबली टॉवर्स या म्हाडा इमारतीमध्ये एक फ्लॅट दाखविला होता. इतकेच नव्हे तर त्यांना फ्लॅटची चावीही दिली होती. मात्र फ्लॅटचे कागदपत्रे आणि अलोटमेंट न दिल्याने ते तिथे राहण्यासाठी गेले नव्हते. तरीही तिने त्यांना फ्लॅटचे आमिष दाखवून त्यांना लवकरात लवकर फ्लॅटचा ताबा कागदपत्रांसहीत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने त्यांच्याकडून 28 लाख 20 हजार रुपये घेतले होते.
तिचा परिचित म्हाडा अधिकारी विनित बनसोडे हा त्यांच्या फ्लॅटचे काम करणार असल्याचे तिने त्यांना सांगितले होते. मात्र दिलेल्या मदतीत तिने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीदरम्यान विनित हा म्हाडा अधिकारी नसून तिचा गाडीचालक असल्याचे समजले होते. तसेच ऋतुषाने त्यांच्यासह इतर बर्याच लोकांना रोड कटींगसह म्हाडाच्या दहा टक्के कोट्यातून फ्लॅटचे आमिष दाखवून गंडा घातला समजले होते. त्यात रश्मी रामचंद्र आईर, साक्षी अनिल जाधव, नेहा निलेश कदम, पांडुरंग यशवंत म्हस्के, सुवर्णा बाळू शेट्ये, टुकराज शिवलाल भंडारी, विजय लक्ष्मण मोरे, प्रशांत प्रकाश घोलेकर, मालती श्रीनिवास पापाभथीनी आणि गणेश राजाराम पवार यांचा समावेश असून या दहाजणांकडून तिने फ्लॅटसाठी 1 कोटी 51 लाख 93 हजार रुपये घेतले होते.
मात्र कोणालाही दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. अशा प्रकारे सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2023 या दोन वर्षांत तिने अकराजणांकडून फ्लॅटसाठी 1 कोटी 80 लाख 13 हजार 300 रुपये घेतले होते. मात्र फ्लॅट न देता फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा पैशांचा अपहार करुन संबंधितांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांच्यासह इतर दहाजणांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मुख्य आरोपी ऋतुजा मोडकसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने या अकराजणांसह इतर काही लोकांना अशाच प्रकारे गंडा घातला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या टोळीकडून फसवणुक झालेल्या लोकांनी काळाचौकी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.