म्हाडा फ्लॅट देण्याची बतावणी करुन 25 लाखांची फसवणुक

निवृत्त शासकीय कर्मचार्‍याला गंडा घालणार्‍या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2025
मुंबई, – गिरणी कामगारासाठी वाटप करण्यात आलेला म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याची बतावणी करुन शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाची 25 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दत्ताराम विष्णू खाडे या मुख्य आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दत्तारामची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

किशोर राजजी विजुंडा हे 62 वर्षांचे वयोवृद्ध लोअर परेल परिसरात त्यांचया पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. शासकीय सेवेतून तीन वर्षांपासून ते निवृत्त झाले असून सध्या घरीच असतात. त्यांची पत्नी रामूबाई ही एका खाजगी कंपनीत कामाला असून तिथेच काम करणार्‍या अक्षय बोयने याने तिला त्याच्या परिचित दत्ताराम खाडे नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचा श्रीनाथ रियल इस्टेट नावाचा व्यवसाय असून तो म्हाडामध्ये स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो. तिला म्हाडाचा फ्लॅट हवा असल्यास दत्ताराम तिला स्वस्तात फ्लॅट मिळवून देईल असे सांगितले होते. घरी आल्यानंतर तिने ही माहिती तिच्या पतीसह दोन्ही मुलांना सांगितली होती. यावेळी त्यांनी म्हाडामध्ये फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता.

दुसर्‍या दिवशी ते सर्वजण दाभोळकरवाडी परिसरात दत्ताराम खाडे याच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी म्हाडाच्या फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी दत्तारामने त्यांना गिरणी कामगारांना देण्यात आलेला परळच्या भोईवाडा परिसरातील म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. सप्टेंबर 2019 रोजी त्यांनी याच फ्लॅटसाठी त्याच्या बँक खात्यात सुमारे 25 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर त्याने त्यांना लवकरात लवकर त्यांचे काम करतो असे सांगितले होते.

मात्र दोन वर्ष उलटूनही त्याने त्यांना म्हाडाचा फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी म्हाडा फ्लॅटचा नाद सोडून त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या 25 लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना दहा आणि पाच लाखांचे दोन धनादेश दिले होते. मात्र ते दोेन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच किशोर विजुंडा यांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दत्ताराम खाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दत्तारामने तक्रारदारासह इतर काही लोकांना म्हाडा, एसआरएच्या फ्लॅटच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page