मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – म्हाडामध्ये वरिष्ठ पदावर काम करत असल्याची बतावणी करुन एका 58 वर्षांच्या व्यक्तीला म्हाडाचे स्वस्तात दोन फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून सुमारे 45 लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पती-पत्नीसह तिघांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. भक्ती अक्षय कांडरकर, अक्षय कांडरकर आणि संतोष निकम अशी या तिघांची नावे असून ते तिघेही प्रभादेवीचे रहिवाशी आहेत. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
58 वर्षांचे तक्रारदार एकनाथ लोडया घरत हे प्रभादेवी येथे राहतात. जानेवारी महिन्यांत त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान संतोषने अक्षय आणि भक्ती हे दोघेही पती-पत्नी असून भक्ती म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली होती. त्यांचा विश्वास संपादन करुन तिच्यासह इतर दोघांनी त्यांना म्हाडामध्ये स्वस्तात दोन फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. जानेवारी ते ऑक्टोंबर 2024 या कालावधीत याच फ्लॅटसाठी त्यांनी त्यांच्याकडून टप्याटप्याने सुमारे 45 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी 41 लाख एनईएफटी आणि उर्वरित चार लाख रुपये कॅश स्वरुपात घेण्यात आले होते. हा संपूर्ण व्यवहार नागपाडा येथील दुसरी गल्ली, इमारत क्रमांक 27, फ्लॅट क्रमांक तेरामध्ये झाला होता.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना म्हाडाचे दोन्ही फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या 45 लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना 25 लाख आणि 20 लाखांचे दोन धनादेश दिले होते. मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. यावेळी भक्तीसह तिचा पती अक्षयने त्यांना प्रभादेवी येथील फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र या फ्लॅटचा ताबाही त्यांनी त्यांना दिला नाही.
म्हाडाच्या दोन फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 45 लाखांचा अपहार करुन या तिघांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भक्तीसह अक्षय आणि संतोष यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यासाठी त्यांना लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.