म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने महिलेला 1.15 कोटीला गंडा
चार भामट्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जुलै 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने एका नामांकित विमा कंपनीतून निवृत्त झालेल्या 59 वर्षांच्या महिलेची चारजणांच्या एका टोळीने एक कोटी पंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही भामट्याविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र तानाजी आचरेकर, प्रभजन ऊर्फ प्रभू श्रीधर पुजार, रमाकांत पांडुरंग महाजनी आणि सतीश ऊर्फ सचिन मधुकर सूर्यवंशी अशी या भामट्याचे नावे आहेत. याच गुन्ह्यांत चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तीन वर्षांत म्हाडाचा फ्लॅट न मिळाल्याने या महिलेने पोलिसांत तक्रार केल्याचे सांगणयात आले.
अॅसिल मेरियन सलदाना ही तक्रारदार महिला माहीम येथील शाहूनगर कॉलनीत राहते. एका नामांकित विमा कंपनीतून ती निवृत्त झाली होती. मार्च 2022 रोजी तिची आरोपीशी ओळख झाली होती. या चौघांनी त्यांची म्हाडा कार्यालयात ओळख आहे. म्हाडातील काही वरिष्ठ अधिकार्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक गरजू लोकांना म्हाडाचे स्वस्तात फ्लॅट मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांनी तिला स्वस्तात म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिनेही त्यांच्याकडे म्हाडा फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती. याच फ्लॅटसाठी तिने त्यांना टप्याटप्याने सुमारे दिड कोटी रुपये दिले होते. त्यापैकी 47 लाख 50 हजार कॅश तर 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते.
मात्र तीन वर्ष उलटूनही त्यांनी तिला म्हाडाचा फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटचे अलॉटमेंट लेटरसह इतर दस्तावेज दिले नाही. त्यामुळे तिने फ्लॅटचा नाद सोडून त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला 34 लाख 50 हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित एक कोटी पंधरा लाखांचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने शाहूनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रामचंद्र आचरेकर, प्रभजन पुजार, रमाकांत महाजनी आणि सतीश सूर्यवंशी या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या चौघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.