दादरमध्ये म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक
निवृत्त वयोवृद्ध शिक्षिकेच्या तक्रारीवरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 ऑगस्ट 2025
मुंबई, – दादरच्या कबुतरखान्याजवळील ब्लिस कासा इमारतीमध्ये म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याच्या आमिषाने एका वयोवृद्ध निवृत्त शिक्षिकेची सुमारे सतरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भक्ती कांडारकर या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एक वर्ष उलटूनही भक्तीने फ्लॅटचा ताबा तसेच फ्लॅटचे कागदपत्रे न दिल्याने तक्रारदार महिलेने पोलिसांना घडलेला सांगितला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
75 वर्षांच्या नंदीनी सुभाष वर्दे या वयोवृद्ध महिला माहीम येथे राहत असून त्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. तिच्या मैत्रिणीची भक्ती ही मैत्रिण असून ती म्हाडाचे काम करते. तिने अनेकांना म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून दिले आहेत असे सांगितले होते. त्यामुळे तिने तिच्या मैत्रिणीला म्हाडाचा एखादा चांगला फ्लॅट असेल तर ती विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी तिने तिची नंदीनी वर्देशी ओळख करुन दिली होती. यावेळी तिने तिला दादर येथील कबुतरखाना, ब्लिस कासा इमारतीमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. हा फ्लॅट तिला 65 लाखांमध्ये घेऊन देत असल्याचे सांगितले. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर तिने तो फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर भक्तीने तिला आधी बारा लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तिने भक्तीला टप्याटप्याने बारा लाख रुपये दिले होते.
म्हाडाची फाईलसह अधिकार्यांना देण्यासाठी तिने तिच्याकडून आणखीन पाच लाख रुपये घेतले होते. या फ्लॅटसाठी सतरा लाख घेतल्यानंतर तिने फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे दस्तावेज दिले नाही. भक्तीकडून सतत टोलवाटोलवी होत असल्याने तिने फ्लॅटचा नाद सोडून तिच्याकडे फ्लॅटसाठी घेतलेल्या सतरा लाखांची मागणी सुरु केली. यावेळी तिने तिला तीन, पाच आणि दहा लाखांचे तीन धनादेश दिले होते. मात्र ते सर्वजण धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देते असे सांगून भक्ती नंदीनी वर्दे हिच्याकडून सतरा लाख रुपये घेऊन या रक्कमेचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने तिच्याविरुद्ध दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भक्ती कांडारकरविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून भक्तीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने तिने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.