म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने महिलेची सतरा लाखांची फसवणुक
पैशांचा अपहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने एका महिलेची सुमारे सतरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दत्ताराम विष्णू खाडे या मुख्य आरोपीविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
52 वर्षांची सुगंधा प्रकाश पाटकर ही महिला वडाळा परिसरात राहते. तिचे पती प्रकाश सदाशिव पाटकर हे बीपीटीमध्ये कामाला आहे. जून 2022 रोजी त्यांचे परिचित महाडिक यांनी दत्ताराम खाडेच्या ओळखीने म्हाडाचा एक फ्लॅट खरेदी केला होता. त्यामुळे तिने तिच्या दोन्ही मुलांच्या भविष्याचा विचार करुन म्हाडाच्या फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. तिला म्हाडाचा फ्लॅट खरेदी करायचा होता, त्यामुळे तिने दत्तारामची भेट घेतली होती. त्याच्याकडे म्हाडाच्या फ्लॅटबाबत विचारणा करुन तिच्यासाठी फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती.
यावेळी दत्तारामने तिला पंधरा दिवसांत सतरा लाख रुपये जमा केल्यास तिला नायगाव येथील जी. डी आंबेडकर मार्ग, बॉम्बेडाईंग म्हाडा कॉम्पॅक्समधील म्हाडाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 601 देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने तिला पंधरा दिवसांत सतरा लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते, त्यामुळे तिने तिच्या मालकीचा अंबरनाथ येथील फ्लॅटची विक्री करुन दत्तारामला सतरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. हा संपूर्ण व्यवहार त्याच्या वरळ येथील भोईवाडा, कॅन्सर सोसायटीजवळील जेरबाई वाडिया रोडच्या श्रीनाथ रियल इस्टेटच्या कार्यालयात झाला होता.
या पेमेंटनंतर त्याने तिला तीन ते चार महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्ष उलटूनही त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर दत्ताराम खाडे तिला वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने दत्तारामकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दत्ताराम खाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी सतरा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. दत्तारामने म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.