मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – म्हाडा एजंट असल्याची बतावणी करुन स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट देते असे सांगून एका महिलेची सुमारे २३ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध समतानगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. स्नेहा रामचंद्र वेरणेकर आणि निरज शाम विश्वकर्मा अशी या दोघांची नावे असून स्नेहाने अशाच प्रकारे अन्य काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत तिला पोलिसांनी अटक केली होती.
४९ वर्षांची भावना महेश संघवी ही महिला कांदिवलीतील न्यू लिंक रोडच्या ओम साई एसआरए अपार्टमेंटमध्ये राहते. आठ वर्षांपूर्वी तिची सोशल मिडीयावर निरजशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. तीन वर्षांपूर्वी त्याने त्याची मावशी स्नेहा वेरणेकर ही म्हाडाची एजंट असून तिने आतापर्यंत अनेकांना म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात दिले आहे. त्यामुळे भाड्याच्या रुममध्ये राहण्याने तिने म्हाडाच्या फ्लॅटसाठी प्रयत्न करावे. स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिला सतत कॉल करुन फ्लॅटबाबत विचारणा करत होता. जून २०२२ रोजी त्याने तिची स्नेहा वेरणेकरशी ओळख करुन दिल होती. यावेळी तिने कांदिवलीतील महावीरनगरमध्ये म्हाडाचे काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तिला एक फ्लॅट ३२ लाखांमध्ये मिळवून देते असे सांगितले. तिचा विश्वास बसावा म्हणून तिने म्हाडा फ्लॅटचे सात ते आठ फाईल तिला दाखविले होते. त्यामुळे तिच्यावर तिचा विश्वास बसला होता. मात्र फ्लॅटची किंमत जास्त असल्याने तिने तिला २८ लाखांपर्यंत फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्यात एका फ्लॅटबाबत करार झाला होता. ठरल्याप्रमाणे भावना संघवीने स्नेहा आणि निरज यांना सप्टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत फ्लॅटसाठी २३ लाख रुपये दिले होते. त्यापैकी पावणेपाच लाख कॅश तर उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. तिने त्यांना आणखीन एक ग्राहक मिळवून दिल्यास निरजने तिला त्यात तिला कमिशन देण्याची ऑफर दिली होती. मात्र तिने त्यास नकार दिला होता.
डिसेंबर २०२३ रोजी या दोघांनी तिला म्हाडाच्या एका फ्लॅटची चावी दिली होती. कागदपत्रांचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे लवकरच फ्लॅटचे कागदपत्रे देऊ असे त्यांनी तिला सांगितले होते. त्यानंतर ती महावीरनगरच्या म्हाडा इमारतीच्या फ्लॅट १५०६ मध्ये गेली होती. मात्र तिने दिलेल्या चावीने कुलूप उघडत नव्हते. त्यामुळे तिने या दोघांनाही संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटताच भावना संघवी हिने चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान तिला ती म्हाडाची इमारत असून तिथे लॉटरी पद्धतीने फ्लॅट मिळतो. कोणत्याही एजंटमार्फत म्हाडा फ्लॅटची विक्री करत नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने स्नेहा आणि निरजकडे पैशांची मागणी सुरु केली होती. त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला. तसेच फ्लॅटही देणार नाही. तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी दिली होती. घडलेल्या प्रकारानंतर तिने समतानगर पोलिसात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्नेहा वेरणेकर आणि निरज विश्वकर्मा या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. स्नेहा ही सराईत गुन्हेगार असून तिने अशाच प्रकारे एका महिलेची सतरा लाखांची फसवणुक केली. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून स्नेहाला अटक केली होती.