अस्तिवात नसलेल्या फ्लॅटचा व्यवहार करणार्या आरोपीस अटक
म्हाडा फ्लॅटचे बोगस ऍलोटमेंट देऊन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – कांदिवलीतील महावीरनगरच्या म्हाडा वसाहतीत अस्तिवात नसलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका तरुणीची साडेआठ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एजंट आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. गणेश विठ्ठल दळवी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. फ्लॅटचे बोगस ऍलोटमेंट देऊन गणेशने ही फसवणुक केल्याचा आरोप आहे.
२९ वर्षांची तक्रारदार तरुणी ही कांदिवली येथे राहत असून एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. याच परिसरात गणेश हा राहत असून तो म्हाडा एजंट म्हणून काम करतो. त्याने तिला कांदिवलीतील महावीरनगरमध्ये असलेल्या म्हाडा इमारतीमध्ये ४२ लाखांचा एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या इमारतीमध्ये चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून त्याने तिला एक फ्लॅट देतो असे सांगून तिला तो फ्लॅट दहा वर्ष विकता येणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे तिने त्याला साडेआठ लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्याने तिला तिच्या नावाने म्हाडाच्या लेटरहेडवर बी-५०३ फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर व्हॉटअपवर पाठवून दिले होते. फ्लॅटचा ताबा तिला डिसेंबर २०२२ रोजी मिळणार होता. त्यामुळे ती म्हाडाच्या इमारतीमध्ये तिच्या फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेली होती. यावेळी तिला तिथे बी-५०३ क्रमांकाचा फ्लॅट नसल्याचे समजले. म्हाडा कार्यालयात फ्लॅटच्या ऍलोट केलेल्या पत्राविषयी चौकशी केली असता म्हाडाने तिच्या नावावर कुठलाही फ्लॅट ऍलोट केला नसल्याचे तिच्या निदर्शनास आले.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने गणेशकडून पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने पैसे न देता तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने बोरिवली पोलिसांत गणेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून गणेश दळवीचा शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना चार महिन्यांपासून फरार असलेल्या गणेश दळवीला अखेर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.