फसवणुकीच्या गुन्ह्यांत मंत्रालयातील बोगस कर्मचार्‍याला अटक

म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या लतिफ शांतवत राजगुरु या बोगस मंत्रालयातील कर्मचार्‍याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. मंत्रालयात कामाला असल्याची बतावणी करुन, म्हाडामध्ये ओळख असल्याचे सांगून स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून लतिफने एका राजकीय पदाधिकार्‍यासह आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निलेश मारुती राऊत शीव-कोळीवाडा परिसरात राहत असून सध्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची पत्नी उमा यादेखील समाजसेविका तसेच राजकारणात आहे. अजय विनायक देसाई आणि शफीक शेख हे त्यांच्या परिचित असून तेदोघेही फिल्मलाईनमध्ये कामाला आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनीच त्यांची ओळख लतिफ राजगुरुशी करुन दिली होती. तो मंत्रालयात कामाला असून त्याची म्हाडासह इतर विभागातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगितले होते. त्यांना नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे त्यांनी त्यांना म्हाडाच्या फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी तुम्हाला लतिफ नक्कीच मदत करेल असे सांगितले होते. लतिफविषयी माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर २०२२ रोजी त्यांची लतिफसोबत भोईवाडा येथे पहिली भेट झाली होती. यावेळी त्यांनी तिथे सुरु असलेल्या म्हाडा इमारतीचा एक सॅम्पल फ्लॅट दाखविला होता. तिथे त्यांना पंधरा लाखांमध्ये फ्लॅट देतो असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यात अंधेरीतील प्रसादम हॉटेलमध्ये पुन्हा एक बैठक झाली होती. यावेळी लत्तिफने मंत्रालयाचे आयकार्ड घातले होते. त्यामुळे तो खरोखरच मंत्रालयात काम करत असल्याची त्यांची खात्री झाली होती.

म्हाडा फ्लॅटबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर निलेश राऊत यांनी लतिफला टप्याटप्याने २० लाख ४२ हजार रुपये तर अरविंद गोवर्धन जाधव यांनी ७ लाख ३३ हजार असे २७ लाख ७५ हजार रुपये दिले होते. यावेळी त्यांना दोन महिन्यांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र आठ ते नऊ महिने उलटूनही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे भोईवाडा येथील म्हाडा इमारतीत जाऊन चौकशी केली असता तिथे त्यांना म्हाडाने कुठलाही फ्लॅट अलोट केला नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन पैसे भरल्याच्या पावत्या आणि इतर कागदपत्रे दाखविले होते, यावेळी तेथील अधिकार्‍यांनी ते सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे सांगितले. जानेवारी २०२३ रोजी त्यांनी मंत्रालयात लतिफची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिथे लतिफ कामावर नसल्याचे समजले होते. तो तिथे काम करत नव्हता. त्याने सिक्युरिटी म्हणून दिलेले धनादेश त्यांनी बँकेत टाकले, मात्र ते सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच निलेश राऊत यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लतिफविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. गेल्या आठ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर दोन दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो सर्वांना मंत्रालयात कामाला असल्याचे सांगून म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगत होता. त्यानंतर म्हाडामध्ये पैसे भरल्याच्या बोगस पावत्या देऊन त्यांचा विश्‍वास संपादन करत होता. इतकेच नव्हे तर काम झाले नाहीतर त्यांना सिक्युरिटी धनादेश देत होता. पैसे ेघतल्यानंतर तो पळून जात होता. आतापर्यंत त्याने कोणालाही म्हाडाचा फ्लॅट दिलेला नाही. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. लतिफने म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने आतापर्यंत किती लोकांची फसवणुक केली. त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे काय केले, ही रक्कम कुठे कुठे गुंतवली याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page