म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेची साडेअकरा लाखांची फसवणुक
विक्रोळीतील घटना; पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने एका महिलेची साडेअकरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रहिम कयाम फारुखी या या आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रहिम हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. तिच्या सासर्याचा विरार येथे एक फ्लॅट होता. या फ्लॅटच्या विक्रीतून तिला अकरा लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे तिला घाटकोपरमधील चाळीत गुंतवणुक म्हणून एक रुम घ्यायचा होात. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिची रहिमशी ओळख झाली होती. त्याने तिला म्हाडामध्ये त्याच्या परिचित एक अधिकारी असून त्याच्या मदतीने तिला विक्रोळीतील कन्नमवारनगरातील म्हाडा वसाहतीत फ्लॅट स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला एक फ्लॅट दाखविला होता, मात्र हा फ्लॅट बंद होता. म्हाडा कार्यालयात सेटींग करुन तिला तोच फ्लॅट देतो असे सांगितले. अशा प्रकारे रहिमने तिच्याकडून म्हाडा फ्लॅटसाठी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत टप्याटप्यात ११ लाख ५६ हजार रुपये घेतले होते. मात्र तिला फ्लॅट तसेच फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. वारंवार विचारणा करुनही तो तिला प्रतिसाद देत नव्हता. फ्लॅटच्या नावाने रहिमकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे न देता पलायन केले होते. या घटनेनंतर तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रहिमविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या रहिमचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.